162 गुन्ह्यांची नोंद असलेला इराणी गॅगच्या म्होरक्याला अटक
बतावणी करुन पादचार्यांचे विशेषता वयोवृद्धांचे दागिने पळवायचे
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) – बतावणी करुन फसवणुकीच्या 162 हून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या इराणी गॅगच्या एका म्होरक्याला अकोला येथून काळाचौकी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सज्जाद गरीबशहा इराणी ऊर्फ पठाण असे या 46 वर्षांच्या म्होरक्याचे नाव असून त्याची स्वतची गॅग आहे. ही गॅग रस्त्यावर जाणार्या पादचार्यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील दागिने पळवून नेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सुमित्रा रामकृष्ण सांपरग ही 77 वर्षांची वयोवृद्ध महिला ही काळाचौकी परिसरात एकटीच राहते. याच परिसरात तिचा मुलगा त्याच्या कुटुंबियासोबत राहत असून तोच तिला आर्थिक मदतीसह जेवण पाठवत होता. दर रविवारी ती त्याच्या घरी जात होती. 5 ऑक्टोंबरला ती तिच्या मुलाच्या घरी जात होती. यावेळी गणेश मंगल कार्यालयाजवळ दोनजण आले. या दोघांनी तिची आपलुकीने चौकशी करुन परिसरात चोर्याच्या घटना वाढल्या आहेत. पुढे काही चोर असून तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यामुळे तिने तिचे सोन्याच्या बांगड्या, सोन्याची माळ कापडी पिशवीत ठेवली होती. याच दरम्यान त्यांनी तिच्याशी गोड बोलून तिच्या पिशवीतील दोन लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते.
काही अंतर गेल्यानंतर तिला हा प्रकार निदर्शनास आले. त्यानंतर तिने काळाचौकी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तकारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत भोसले, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, पोलीस शिपाई गोपाळ चव्हाण, पराग शिंदे, खांडेकर, पोलीस नाईक गोविंद ठोके यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील दिडशेहून फुटेजची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली होती. यातील एका फुटेजमध्ये सज्जाद इराणी दिसून आला होता. सज्जाद हा अशा गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गुन्हा घडल्यानंतर तो मुंबईतून पळून गेला होता. तो सध्या अकोला शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर त्याच्या अटकेसाठी एक टिम अकोला येथे पाठविण्यात आली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अकोला येथील इराणी वस्तीत साध्या वेशात पाळत ठेवून सज्जाद इराणी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सज्जाद हा बतावणी करुन फसवणुक करणार्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची स्वतची इराणी गॅग असून या गॅगने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई तसेच इतर शहरात अनेक गुन्हे केले आहेत. सज्जादविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 162 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.