शिवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल
मतपत्रिकेचा फोटो सोशल मिडीयावर ठेवणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रियाज लियाकत पठाण यांच्याविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लघंन तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणे रियाज पठाण यांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडून कायदेशीर कारवाई होणार आहे.
रियाज हे मूळचे सातारा येथील कोरेगावचे रहिवाशी आहेत. सध्या ते शिवडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. १४ नोव्हेंबरला शासकीय कर्मचार्यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. जे. जे रोडच्या ऍलन ह्यूम स्कूलशेजारी रिचर्डस ऍण्ड क्रुडास कंपनीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले होते. यावेळी रियाज पठाण हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतदान करण्यासाठी आले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी मतपत्रिकेचा फोटो त्यांच्या मोबाईलवर काढला होता. हा फोटो नंतर त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. हा प्रकार निवडणुक अधिकारी मनोज सुरेश कोष्टी यांच्या निदर्शनास आला होता. रियाज पठाण यांनी निवडणुक आयोगाने दिलेल्या नियमांचे उल्लघंन केले होते. तसेच मतदानाची गोपनियतेचा भंग केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रियाज पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशाच एका प्रकारे पोलीस कर्मचार्याने मतपत्रिकेचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याबाबत संबंधित पोलीस कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाला होता.