विलेपार्ले येथील जैन मंदिरातील चोरीचा पर्दाफाश

मुख्य आरोपीसह दोघांना भोपाळ येथून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – विलेपार्ले येथील जैन मंदिरात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात सांताक्रुज पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सुशांन निरंजन मिरीधा आणि प्रभुदेवा ओमप्रकाश खारवार ऊर्फ काल्या अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुशांनविरुद्ध पंधराहून मुंबईसह सुरत शहरात बावीसहून अधिक रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबईत घरफोडी करुन सुशान हा त्याच्या मध्यप्रदेशातील गावी पळून जात होता. काही दिवसांनी तो पुन्हा मुंबईत घरफोडीसाठी येत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

स्मित बिपीन गांधी हे व्यावसायिक असून विलेपार्ले येथील सेंट मेरी रोड, हेमो एन्ड एल्व अपार्टमेंटमध्ये राहतात. याच परिसरात एक जैन मंदिर असून या मंदिरात त्यांचे वडिल बिपीन आणि मोठा भाऊ लकीर गांधी हे सदस्य आहेत. जैन मंदिरात आदिनाथ, सुमथीनाथ, महावीर स्वामी, पार्श्वनाथ भगवान यांचे सोन्या-चांदीच्या मूर्त्या आहेत. या मूर्त्यासोबत कोणी खोडसाळपणा करु नये म्हणून सुरक्षेसाठी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच आणि रात्री आठ ते सकाळी सहा वाजेदरम्यान मंदिर बंद ठेवून मंदिराच्या लोखंडी स्लायडिंग गेटला लॉक लावण्यात येते. 14 जुलैला बिपीन गांधी हे मंदिरात पूजेसाठी गेले होते. यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता महावीर स्वामी भगवान चांदीची मूर्ती, मूर्तीला लावलेले सोन्याची तीन कपाली, हिरेजडीत सोन्यांची तीन लांचन, चांदीचे दोन मुगुट, सुमथीनाथ भगवान पंचधातू मूर्ती, एक मुगुट, सोन्याचे तीन तिलक, गळ्यातील तीन सोन्याचे कंठा, चांदीचे एक तोरण, चांदीचे दोन कलश, सोन्याची एक वाटी, एक चंद्राची वाटी, दोन पित्तल बकेट, कुंडी, दिवा, एक चंद्राची दर्पण, पंखा, चामर, अश्ठमंगल पाटली पंचधातू मूर्ती, सिद्धचक्र भगवान पंचधातू मूर्ती, मंदिरातील पितळ्याची पंधरा प्लेट, चांदीचे जर्मन चार प्लेट असा सुमारे 8 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी स्मित गांधी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. जैन मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कल्हाटकर, पोलीस हवालदार केणी, सालदुरकर, पोलीस शिपाई हिरेमठ, माने, दिवाणजी, स्वप्निल काकडे यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरु केला होता. त्यात सुशांन मिरीधाची ओळख पटली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तांत्रिक माहितीवरुन तो मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याला भोपाळ येथून अटक केली. त्याच्या चौकशीत प्रभुदेवा खारवर याचे नाव समोर आले होते. त्यानंतर प्रभुदेव याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीत सुशांन हा मूळचा मध्यप्रदेशच्या बैतूल, घोडाडोंगरीचा रहिवाशी आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात बारा, डी. एन नगर पोलीस ठाण्यात एक, सुरतच्या पांडेसारा पोलीस ठाण्यात दोन रॉबरीसह घरफोडी, घातक शस्त्रे बाळगणे तर प्रभूदेवाविरुद्धही घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. या दोघांकडून चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस कोठडीनंतर त्यांची वांद्रे येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page