जैन मंदिरातील पावणेदोन कोटीच्या घरफोडीचा पर्दाफाश

चोरीनंतर मध्यप्रदेशात पळालेल्या माजी सुरक्षारक्षकाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – लालबाग परिसरातील अविघ्न स्टेट मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ या ट्रस्टच्या मंदिरातील पावणेदोन कोटीच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात काळाचौकी पोलिसांना यश आले आहे. चोरीनंतर मध्यप्रदेशातील गावी पळून गेलेल्या मंदिराच्या माजी सुरक्षारक्षकाला अवघ्या 48 तासांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. जितेंद्र ऊर्फ जितन ऊर्फ बंटी पंडित नगाईच असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व हिरेजडीत सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडी सुनावली आहे. जितेंद्र नगाईच हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, लुटमारीचे सतराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

जयेश चंपालाल जैन हे लालबागच्या अविघ्न नाईन, रुम क्रमांक 2104 मध्ये राहत असून व्यवसायाने कापड व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे काळबादेवी परिसरात शानदार सिल्क मिल नावाचे एक कपड्याचे दुकान आहे. लालबाग परिसरात अविघ्न स्टेट मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ नावाची एक ट्रस्ट असून याच ट्रस्टमध्ये जयेश जैन हे कार्यकारी सदस्य म्हणून काम पाहतात. ट्रस्टचे एक मंदिर असून या मंदिरात भगवान सिमंदर यांची एक मूर्ती आहे. या मूर्तीला हिरेजडीत सोन्याचे दागिने घालण्यात आले आहे. मंदिरात तीन पुजारी असून भाविकासाठी मंदिर सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत खुले असते.

सोमवारी पाच वाजता मंदिरातील एक पुजारी कृष्णा हे नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. यावेळी त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यात भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरील विविध सोन्याचे दागिने आणि हिर्‍यांचा एक टिका असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या घटनेची पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत काळाचौकी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेनंतर मंदिरासह परिसरातील तीनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यात या चोरीमागे मंदिरातील माजी सुरक्षारक्षक जितेंद्र नगाईच याचा सहभाग उघडकीस आला होता. चोरीनंतर तो त्याच्या मध्यप्रदेशातील गावी पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी एका विशेष पथकाची नियुक्ती करुन या टिमला मध्यप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला होता.

यावेळी जितेंद्र नगाईच हा नातेवाईकाच्या घराच्या छतावर लपून बसला होता. त्यामुळे ही टिम तिथे गेली होती. त्याचा शोध सुरु असताना तो घराच्या छतावरुन दुसर्‍या घराच्या छतावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला, मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत जितेंद्रने जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली देताना पोलिसांना चोरीचा सर्व मुद्देमाल दिला. चोरीच्या विविध सोन्याचे दागिने, हिर्‍यासह त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस टिम पुढील कारवाईसाठी मुंबईत आली होती.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात जितेंद्र नगाईच हा पूर्वी याच मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवर कोट्यवधी रुपयांचे दागिने घालण्यात आल्याची त्याला माहिती दिली होती. त्यामुळे त्याने ते दागिने चोरीची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे 29 मार्चला मंदिर बंद होताच तो मंदिरात आला आणि त्याने कुलूप तोडून आतील सर्व दागिने चोरी करुन पलायन केले होते. मात्र चोरी करताना तो सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसला.

घरफोडीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 48 तासांत त्याला पोलिसांनी चोरीच्या शंभर टक्के मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली. तपासात जितेंद्र मूळचा मध्यप्रदेशच्या भिंडचा रहिवाशी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात सतराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून त्यात आर्म्स अ‍ॅक्टसह लुटमारीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत भोसले, हसन मुलानी, गोविंद खैरे, प्रताप बंडगर, श्यामसुंदर भिसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, धनंजय व्यवहारे, शीतल माने, सागर बनकर, ऋषिकेश कर्नर, पोलीस शिपई लक्ष्मण खांडेकर, गणेश कोळेकर, पंकज आंग्रे, यिजय सोनावणे, गोपाल चव्हाण, प्रशांत पवार, महिला पोलीस शिपाई तेजस्विनी गवारी, कुंभार, संकेत नायकवडी, पोलीस हवालदार अमर चन्ने, गोविंद ठोके यांनी केली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 48 तासांत आरोपीला मध्यप्रदेशातून अटक करुन त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करणार्‍या या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page