जैन संघ ट्रस्टच्या मंदिरात पावणेदोन कोटीचे दागिने चोरट्याने पळविले
घरफोडीचा गुन्हा दाखल करुन आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – लालबाग परिसरातील अविघ्न स्टेट मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ या ट्रस्टच्या मंदिरातील भगवान सिमंदर यांच्या अंगावरील विविध सोन्याचे दागिने आणि हिर्याचा एक टिका असा सुमारे पावणेदोन कोटीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी करुन पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जयेश चंपालाल जैन हे लालबागच्या अविघ्न नाईन, रुम क्रमांक 2104 मध्ये राहत असून व्यवसायाने कापड व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे काळबादेवी परिसरात शानदार सिल्क मिल नावाचे एक कपड्याचे दुकान आहे. लालबाग परिसरात अविघ्न स्टेट मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ नावाची एक ट्रस्ट असून याच ट्रस्टमध्ये जयेश जैन हे कार्यकारी सदस्य म्हणून काम पाहतात. ट्रस्टचे एक मंदिर असून या मंदिरात भगवान सिमंदर यांची एक मूर्ती आहे. या मूर्तीला हिरेजडीत सोन्याचे दागिने घालण्यात आले आहे. मंदिरात तीन पुजारी असून भाविकासाठी मंदिर सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत खुले असते.
सोमवारी पाच वाजता मंदिरातील एक पुजारी कृष्णा हे नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. यावेळी त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यात भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरील विविध सोन्याचे दागिने आणि हिर्यांचा एक टिका असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी मंदिरातील ट्रस्टींना ही माहिती दिली. या माहितीनंतर जयेश जैन यांच्यासह इतर ट्रस्टीने मंदिरात धाव घेतली होती.
अज्ञात व्यक्तीने 29 मार्चला रात्री नऊ ते 30 मार्च पहाटे पाच या कालावधीत मंदिरातील कुलूप तोडून भगवान सिमंदर यांना घालण्यात आलेल्या दिड कोटीचे विविध सोन्याचे दागिने आणि पंचवीस लाखांचा एक हिर्याचा टिका असा सुमारे पावणेदोन कोटीचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच जयेश जैन यांच्या वतीने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
मंदिरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला लवकरच चोरीच्या मुद्देमालासह अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी जैन मंदिरात उघडकीस आलेल्या चोरीच्या या घटनेने भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.