बिल्डर जयेश तन्नाला फसवणुकीच्या अन्य एका गुन्ह्यांत अटक
वयोवृद्ध महिलेच्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – पुर्नविकासासाठी दिलेल्या फ्लॅटचा ताबा न देता फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री करुन एका सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी जयेश विनोद तन्ना या बिल्डरला अन्य एका फसवणुकीच्या गुन्ह्यांत गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी दुजोरा दिला आहे. जयेश हा सराईत व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांत त्याने आतापर्यंत कोट्यवधींचा अपहार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अरविंदकुमार रामप्रसाद सिंग यांचा स्प्रे पेटींगचा व्यवसाय असून ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांच्या वडिलांच्या मालकीचा गोरेगाव, सिद्धार्थनगरातील एका चाळीत एक रुम होता. वडिलांच्या निधनानंतर हा रुम त्यांची आई शांतीदेवी हिच्या नावावर झाला होता. शांतीदेवी या सत्तर वर्षांची वयोवृद्ध असल्याने ती कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत सहभाग घेत नव्हती. त्यामुळे तिने जानेवारी २०१९ रोजी अरविंदकुमार यांच्या नावाने मुख्त्यार पत्र बनविले होते. २०१० साली त्यांची चाळ पुर्नविकासासाठी मेसर्स साई-सिद्धी डेव्हल्पर्सचे भागीदार जयेश तन्ना यांनी घेतली होती. एकूण सात चाळीतील २८ पैकी आठ सदस्यांनी घर एक्सचेंज डिड करार केला होता तर इतर सभासदांनी घराच्या मोबदल्यात सत्तर लाख रुपये घेतले होते. यावेळी जयेश तन्नाने शांतीदेवी यांना पुर्नविकासातील नवीन इमारतीमघ्ये बाराव्या मजल्यावर १२०३ क्रमांक फ्लॅट अलोट केला होता.
नोव्हेंबर २०११ ते मार्च २०१ पर्यंत जयेशने संबंधित आठ फ्लॅटधारकांना दरमाह तीस हजार तर एप्रिल २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत तेत्तीस हजार भाडे दिले. मात्र नंतर त्याने भाडे देणे बंद केले होते. सात मजल्याचे काम पूर्ण केल्यानंतर त्याने इमारतीचे बांधकाम बंद केले. त्यामुळे संबंंधित आठ फ्लॅटधारकांनी जयेश तन्नाविरुद्ध न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. काही महिन्यानंतर अरविंदकुमार यांना त्यांची आई शांतीदेवी हिच्या फ्लॅटची जयेश तन्नाने परस्पर त्रिखा कुटुंबियांनी विक्री करुन तिची फसवणुक केल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी जयेश तन्नाची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने भेट देण्यास नकार दिला.
जयेश तन्ना याने शांतीदेवीचा फ्लॅट पुर्नविकासाठी ताब्यात घेऊन या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच शांतीदेवी यांच्या वतीने त्यांचा मुलगा अरविंदकुमार सिंग यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात जयेश तन्नाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जानेवारी महिन्यांत त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी २८ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्याच आठवड्यात जयेशला अशाच एका फसववणुकीच्या गुन्ह्यांत डी. एन नगर पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा ताबा मिळावा यासाठी गोरेगाव पोलिसांकडून स्थानिक न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. जयेशविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तीन, कांदिवली पोलीस ठाणे पाच, डी. एन नगर पोलीस ठाण्यात तीन, आंबोली, गोरेगाव पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फसवणुक झालेले बरेच तक्रारदार पुढे येत असल्याचे एका अघिकार्याने बोलताना सांगितले.