जे. जे हत्याकांडातील वॉण्टेड आरोपीस उत्तरप्रदेशातून अटक
आरोपी दाऊद टोळीशी संबंधित; ३२ वर्षांपासून वॉण्टेड होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भावोजी इब्राहिम पारकर ऊर्फ इब्राहिम लंबू याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या शूटरला जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठवून एके ४७ मधून गोळीबार करुन जे. जे हत्याकांड घडविणार्या एका मोस्ट वॉण्टेड आरोपीला ३२ वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकासह गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला यश आले आहे. त्रिभुवन रामपती सिंग असे या ६४ वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेशात श्रीकांत राय रामपती ऊर्फ प्रधान या बोगस नावाने वास्तव्यास होता. त्रिभुवन हा दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असून जे. जे हत्याकांडात गेल्या ३२ वर्षांपासून वॉण्टेड होता. मिर्झापूर मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला विशेष टाडा कोर्टाने शुक्रवार २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इब्राहिम पारकर हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा पती आहे. १९९२ साली इब्राहिम पारकर याची अरुण गवळी टोळीच्या शैलेश हळदणकर, बिपीन शेरेसह इतर गुंडांनी हत्या केली होती. या हत्येच्या वेळेस ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. बहिणीच्या पतीच्या हत्येनंतर दाऊद प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने सुभाषसिंग ठाकूरवर शैलेश आणि बिपीनच्या हत्येची सोपविली होती. दाऊदच्या आदेशानंतर सुभाषसिंग, ब्रिजेश सिंगसह इतर गुंडांनी १२ सप्टेंबर १९९२ साली जे. जे हॉस्पिटलच्या दुसर्या मजल्यावर एके ४७ मधून अंधाधुंद गोळीबार तसेच हातबॉम्बने हल्ला करुन शैलेश हळदणकर याची हत्या केली होती. त्यात दोन पोलिसांचाही मृत्यू झाला होता. या गोळीबारात त्रिभुवन सिंग हा जखमी झाला होता, मात्र याच अवस्थेत तो पळून गेला होता. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून नंतर त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. याच गुन्ह्यांत सुभाषसिंग ठाकूरसह तीस आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती तर सुभाषसिंग ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्रिभुवन सिंग याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते.
त्याचा शोध सुरु असताना उत्तरप्रदेशात श्रीकांत रामपती या आरोपीविरुद्ध एक हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक करुन मिर्झापूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. श्रीकांत हाच दाऊद इब्राहिमचा शूटर त्रिभुवन सिंग असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही बाब कोर्टात सिद्ध करुन त्याचा ताबा मिळविला होता. कोर्टाने ट्रान्झिंट रिमांड मिळताच त्रिभुवनला पुढील चौकशीसाठी शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी विशेष टाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद कांटे, पोलीस निरीक्षक लोणकर, इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली.