इंटेरियल कामादरम्यान 24 लाखांच्या सोन्याच्या बारवर हातसफाई
मुंबईतून पळून गेलेल्या कामगाराला उत्तरप्रदेशातून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – इंटेरियल कामादरम्यान लाकडी कपाटातील सुमारे 24 लाख रुपयांचे सोन्याचे बार चोरी करुन एका कामगाराने पलायन केले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच मुंबईतून पळून गेलेल्या कामगाराला जे. जे मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली. इर्शाद कालू खान असे या कामगाराचे नाव असून त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील तपासाकामी मुंबईत आणले जात आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे बार लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
युनूफ इब्राहिम कासमानी हे डिम टिमकर रोड परिसरात राहत असून त्यांचा भायखळा मार्केटमध्ये कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या घरी इंटेरियरचे काम सुरु होते. ते काम त्यांनी त्यांच्या परिचित खालिद खान याला दिले होते. या कामासाठी त्यांच्या घरी तीन ते चार येत होते. 29 नोव्हेंबरला ते सकाळी साडेपाच वाजता वाशी मार्केटमध्ये गेले होते. सकाळी दहा वाजता खालिदने बेडरुमच्या सिलिंगचे पीओपी करण्यासाठी तीन कामगारांना पाठविले होते. सकाळी साडेअकरा वाता तीनपैकी एक कामगार अचानक घाईघाईने घरातून निघून गेला होता.
हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटला होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. सायंकाळी त्यांनी त्यांच्या घरातील लाकडी कपाट उघडले असता त्यात त्यांनी ठेवलेले 24 कॅरेटचे 24 लाख रुपयांचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार नव्हते. याबाबत त्यांनी पत्नीकडे विचारणा केली, मात्र तिला या बारबाबत काहीच माहिती नव्हती. सकाळी त्यांच्या घरातून एक कामगार अचानक निघून गेला होता, त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी खालिद खानकडे त्या कामगाराविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी खालिदने त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे सांगितले.
युनूफ कासमानी यांनी जे. जे मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या कामगाराविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासात हा कामगार मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी होता, चोरीनंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता होती. त्यामुळे जे. जे मार्ग पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला रवाना झाली होती. त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन तो सतत त्याचे वास्तव्य बदलत होता.
तपासादरम्यान तो एका खाजगी बसने मथोड कानूपर महामार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून इर्शाद खानला ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच त्याने बसच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला गेला.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्यानंतर त्याचा ताबा घेऊन पोलीस टिम मुंबईकडे येण्यास निघाली. मुंबईत आणल्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.