जे. जे हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या बांगलादेशी महिलेस अटक

मुंबईतून पळून गेल्यानंतर नवी मुंबईत गेल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 ऑगस्ट 2025
मुंबई, – वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर जे. जे हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या रुबीना इर्शाद शेख या 21 वर्षांच्या बांगलादेशी महिलेस अटक करण्यात अखेर जे. जे मार्ग पोलिसांना यश आले आहे. जे. जे हॉस्पिटलमधून पळून गेल्यानंतर ती नवी मुंबईत गेली होती, अखेर तिला तीन दिवस साध्या वेशात पाळत ठेवून नवी मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर तिला पुन्हा भायखळा जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

रुबीना ही मूळची बांगलादेशातील साहेबगंज राज, बालोंगासच्या सत्तरतोलाची रहिवाशी असून सध्या नवी मुंबईतील सेक्टर पाच, कौपरखैरणे परिसरात राहत होती. तिच्याविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक करणे, मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर नवी मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायायीन कोठडीत होती. त्यामुळे तिला भायखळा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ती पाच महिन्यांची गरोदर होती. त्यात तिला थंडीताप, त्वचेसंबंधी आजार झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी गुरुवारी 14 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता जे. जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत काही महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन ती महिला पोलीस शिपाई काजल रामचंद्र शिंदे हिच्या हातावर झटका देऊन हॉस्पिटलमधून पळून गेली होती. तिचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. या घटनेनंतर काजल शिंदे यांनी जे. जे मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रुबीनाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर रुबीना शेखविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकूंदा वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार नियाजुद्दीन तडवी, सचिन पाटील, पोलीस शिपाई मंदार घाडगे, प्रविण शेवरे, दिपक डावरे, ब्रम्हदेव कोलपूसे महिला पोलीस शिपाई लहाने, गोफने यांनी तपास सुरु केला होता.

हॉस्पिटलसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या रुबीनाच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना ती नवी मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी घरकाम करत होती. त्यामुळे या पथकाने तिथे तीन दिवस साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी तिला नवी मुंबईतील घनसोली, नवघर अली रोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेनंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अटकेनंतर तिला पुन्हा भायखळा जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page