मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी गेलेल्या मुलीवर लैगिंक अत्याचार
गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस येताच गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी जाणे एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले. मैत्रिणीच्या घरात एका अज्ञात व्यक्तीवर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला, त्यातून ती गरोदर राहिली आणि मेडीकल तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पिडीत मुलीला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ती सध्या साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतरा वर्षांची पिडीत मुलगी ही कळवा येथे राहते. फोर्ट परिसरात तिची सुनिता नावाची एक मैत्रिण राहते. 15 डिसेंबरला तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने तिला तिच्या राहत्या घरी वाढदिवसानिमित्त बोलाविले होते. सुनिता ही खास मैत्रिण असल्याने ती तिच्या घरी गेली होती. यावेळी वाढदिवसाला आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिला बाथरुममध्ये नेले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तो पळून गेला होता.
बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे ती जे. जे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली होती. तिची मेडीकल केल्यानंतर ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. ही मुलगी अल्वयीन असल्याने ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून जे. जे मार्ग पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यांत घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिची मैत्रिण सुनिता हिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर आरोपीची माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. हा गुन्हा फोर्ट परिसरात घडल्याने त्याचा तपास संबंधित पोलिसांकडे पाठविण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.