मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – कामावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून युसूफ मोहरम अली या 24 वर्षांच्या कामगार तरुणावर त्याच्या मालकाने बेदम मारहाणीसह छातीत कैचीने प्राणघातक हल्ला करुन हत्या केल्याची घटना बोहरी मोहल्ला परिसरात घडली. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन मालक मोहम्मद फिरोज अजमेरअली सय्यद (22) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास बोहरी मोहल्ला येथील अलहिजबरिदा टेलर, शॉप क्रमांक एफ/34 मध्ये घडली. मोहम्मद फिरोज सय्यद हा व्यावसायिक असून त्याचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्याच्याकडेच मृत युसूफ अली हा कामाला होता. रमजान सुरु असल्याने त्यांच्याकडे कामाचा प्रचंड लोड होता. त्यातच मंगळवारी मोहम्मद फिरोज आणि युसूफ अली यांच्यात कामावरुन क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने युसुफ अलीला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्या छातीत कैचीने भोसकले होते. त्यात युसुफ हा गंभीररीत्या जखमी झाला होता.
हल्ल्यानंतर मोहम्मद फिरोज तेथून पळून गेला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच जे. जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या युसूफला पोलिसांनी तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तिथेच उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला जे. जे मार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
मात्र युसूफच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी आरोपी मोहम्मद फिरोज सय्यदविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या मोहम्मद फिरोजला काही तासांत पोलिसांनी अटक केली. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.