कॅनडामध्ये नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्या ठगाला अटक
गुन्हा दाखल होताच सात महिन्यांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कॅनडामधील हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणुक करणार्या ठगाला कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विंसेंट जॉन मेंजेस असे या 56 वर्षीय आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो सात महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
श्याम काशिराम सावंत हे कांदिवलीतील लालजीपाडा, एकतानगर परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा कल्पेश हा रत्नागिरी येथील कोहीनूर हॉटेलमध्ये तर ते स्वत कांदिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. 2023 साली कल्पेशने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. यावेळी त्यांच्या कॉलेजच्या लॅबच्या मित्राने त्यांच्या परिचित एक व्यक्ती विदेशात नोकरी देत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ते त्यांच्या मित्रासोबत विसेंट मेंजेस याच्या विरार येथील घरी गेले होते. तिथे त्यांची भेट झाली होती. या भेटीत विंसेट याने त्यांच्या मुलाला कॅनडामधील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
व्हिसा आणि मेडीकलसाठी किमान अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही प्रोसेसिंग पूर्ण होताच त्यांच्या मुलाला कॅनडाला पाठविण्यात येईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला कल्पेशचे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह व्हिसा आणि मेडीकलसाठी अडीच लाख रुपये दिले होते. सहा महिन्यांत त्याचा व्हिसा आणि नोकरीच्या नियुक्तीचे पत्र येईल असे त्याने सांगितले होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने त्यांच्या मुलाचे काम केले नाही. मेडीकलच्या नावाने तो त्याला सतत वेगवेगळ्या तारखा देत होता. त्यामुळे त्याची मेडीकल झाली नव्हती.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे नोकरीचा विषय सोडून दिला होता. नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती, मात्र दिलेल्या आश्वानानंतरही त्याने त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विंसेंट मेंजेसविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी नोकरीच्या आमिषाने पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.
गेल्या सात महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणांना विदेशात नोकरीच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.