मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने १८.५० लाखांची फसवणुक

शिपाई पदाचे बोगस नियुक्तीपत्र देणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने एका ४० वर्षांच्या व्यक्तीची त्याच्या वर्गमित्रासह महिला सहकार्‍याने १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. शिपाई पदाचे बोगस नियुक्तीपत्र देऊन फसवणुक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र अतकारी आणि पिंकी ऊर्फ प्रियांका जाधव या दोघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु असून त्यांच्या चौकशीतून अशा प्रकारच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सचिन सुभाष घोडके हे घाटकोपरच्या पारशीवाडी, अंजनी कुमार चाळीत राहतात. त्यांची स्वतची फिनिक्स फॅसलिटी मॅनेजमेट नावाची एक हाऊसकिपिंग कंपनी आहे. व्यवसाय करण्यापूर्वी ते स्वतसाठी नोकरीच्या शोधात होते. यावेळी त्यांचा वर्गमित्र असलेला प्रदीप अतकारी याच्यासोबत त्यांची भेट झाली होती. या भेटीत त्याने त्यांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान प्रदीपने त्यांची ओळख पिंकीसोबत करुन दिली होती. पिंकीची मंत्रालयात प्रचंड ओळख असून तिच्याच मदतीने त्याला नोकरी मिळेल असे सांगितले. तिनेही त्यांना नोकरीचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या विविध भुलपाथांना भुलून त्यांनीही त्यांना नोकरीसाठी पैसे देण्याचे मान्य केले होते. काही दिवसांनी त्यांना या दोघांनी जे. जे रुग्णायात मेडीकलसाठी बोलाविले होते. तिथे त्यांना त्यांनी कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय यांचे स्वाक्षरीचे एक पत्र दिले होते. मेडीकलसह नोकरीच्या पत्राने त्यांना त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना टप्याटप्याने नोकरीसाठी १८ लाख ५० हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना महसूल आणि वन विभागच्या शिपाई पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. मात्र नोकरीवर कधी रुजू व्हावे यासाठी त्यांनी त्याच्याकडून वेळ मागून घेतली होती. बर्‍याच दिवसानंतर या दोघांनी त्यांना कॉल केला नाही. त्यामुळे त्यांनीच त्यांच्याकडे विचारणा सुरु केली असता ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना भेटण्यास टाळत होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच ते स्वत मंत्रालयात गेले होते. त्यांनी महसूल आणि वन विभागातील त्यांच्या नियुक्तीचे पत्र दाखविले. यावेळी तिथे उपस्थित कर्मचार्‍यांनी तिथे प्रदीप अतकारी आणि पिंकी ऊर्फ प्रियांका जाधव असे कोणीही नोकरीस नाही. तसेच त्यांच्याकडे असलेले पत्र बोगस असून या विभागाने त्यांच्या नावाने नोकरीचे नियुक्तपत्र जारी केले नाही असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच सचिन घोडके यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रदीप अतकारी आणि पिंकी जाधव या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी मंत्रालयात नियुक्तीचे बोगस पत्र कुठे बनविले, नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का, सचिन घोडके यांच्याकडून घेतलेल्या पैशांची त्यांनी कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page