अमेरिकेत नोकरीच्या आमिषाने स्टॉक ब्रोकर तरुणाला गंडा

12 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – अमेरिकेतील एका नामांकित हॉटेलमध्ये सुपरवायझर पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून एका स्टॉक ब्रोकर तरुणाला त्याच्याच परिचित आरोपीने गंडा घातल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अली इस्तियाक अहमद या आरोपीविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी अली हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अमेय श्रीकांत जांभळे हा जोगेश्वरी येथे राहत असून शेअरमार्केटमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून कामाला आहे. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने त्याचा परिचित आरोपी अलीला सांगितले होते. जुलै 2024 रोजी अलीने त्याच्यासह त्याच्या काकांना जोगेश्वरीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथेच त्याने अमेरिकेतील एका हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी असल्याचे सांगून त्यासाठी त्यांना किमान बारा लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. त्याच्याकडून होकार येताच त्याने त्याचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेतले होते. तिकिट आणि व्हिसासाठी सव्वा लाख रुपये घेतले होते.

काही दिवसांनी त्याने त्याला विमानाचे तिकिट, व्हिसाचे दस्तावेज व्हॉटअपवर पाठविले होते. त्यामुळे त्याला त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्याने त्याला नोकरीसाठी टप्याटप्याने पावणेअकरा लाख रुपये दिले होते. मात्र त्याने नोकरीचे नियुक्तीपत्र, करारनामा आदी दस्तावेज दिले नाही. कॉल केल्यानंतर तो त्याला प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच अमेय जांभळे याच्याविरुद्ध जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अली अहमदविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अलीने विदेशात नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page