नामांकित बँकेत नोकरीच्या आमिषाने 19 लाखांना गंडा

महिलेविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – शहरातील एका नामांकित बँकेत नोकरीच्या आमिषाने एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाची महिलेने सुमारे 19 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रद्धा पाटील नाव सांगणार्‍या एका महिलेविरुद्ध अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नोकरीच्या आमिषाने श्रद्धाने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

प्रज्ञा विनोद कुलकर्णी ही 61 वर्षांची वयोवृद्ध महिला वडाळा येथे राहते. तिचा मुगा देवाशिश हा उच्चशिक्षित असून कोव्हीड पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याला शारीरिक आजार झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवाशिश हा चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी त्यांनी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. गेल्या वर्षी मे महिन्यांत त्याला श्रद्धा पाटील नावाच्या एका महिलेने कॉल केला होता. तिने एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगून विविध नामांकित बॅकांमध्ये उच्च पदासाठी नोकरी असल्याचे सांगितले होते.

त्याला नोकरीचे आश्वासन देत तिने त्याच्याकडून त्याचा सीव्ही मागून घेतला होता. त्यामुळे त्याने तिला त्याचा सीव्ही पाठवून दिला होता. त्यानंतर तिने त्याचे बँकेत काम होईल असे सांगून त्यांना रजिस्ट्रेशन, प्रोसेसिंग फी, मुलाखत तसेच इतर कामासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्याने तिने सांगितलेली रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. 25 मे ते 25 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत त्याने तिला नोकरीसाठी 19 लाख 44 हजार 500 रुपये पाठविले होते, मात्र तिने त्याला नोकरी दिली नाही.

नोकरीच्या बहाण्याने विश्वास संपादन करुन तिने त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर देवाशिशला समजताच त्याने ही माहिती त्याच्या आईला सांगितली. त्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याच्या वतीने त्याच्या आईने अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांना हा प्रकार सांगून श्रद्धा पाटील नाव सांगणार्‍या महिलेविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून श्रद्धाच्या मोबाईलवरुन तिचे लोकेशनसह इतर माहिती काढली जात आहे. याच गुन्ह्यांत तिला लवकरच केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रद्धाने नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page