नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या तोतया पोलिसाला अटक

फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांची उकल तर इतर गुन्हे उघड होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जुलै 2025
मुंबई, – आरपीएफमध्ये अकाऊंट विभागात नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीला गंडा घालणार्‍या संदीप नगीन पटेल या 44 वर्षांच्या तोतया पोलिसाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. अकाऊंट विभागात सातजणांची आवश्यकता असल्याचे सांगून संदीपने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये घेऊन त्याला युनिफॉर्म आणून देतो असे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

25 वर्षांचा तक्रारदार तरुण हा वसई येथे राहत असून एका खाजगी बँकेत कामाला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता तो अंधेरी रेल्वे स्थानकात आला होता. तिथेच त्याची संदीपशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने तो पोलीस असल्याची बतावणी करुन सध्या आरपीएफमध्ये अकाऊंट विभागात कामाला असल्याचे सांगितले. त्यांच्या विभागात भरती सुरु असून आज मुलाखतीचा शेवटचा दिवस आहे. त्याला नोकरीचे आमिष दाखवून त्याने त्याला अकाऊंट विभागात आणखीन सात तरुणांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस येथे आणले. मुलाखत होण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडे ओळखपत्रासह युनिफॉर्मसाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे या तरुणाने त्याला सहा हजार रुपये दिले होते.

सहा हजार रुपये घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या व्यक्तीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मागे न पाहता पळण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी त्याने आरडाओरड करुन गस्त घालणार्‍या संदीप पटेलला काही अंतरानंतर ताब्यात घेतले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून या तरुणाने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली.

तपासात संदीप हा अंबरनाथ, गणेश विसर्जनजवळील एका निवासी इमारतीमध्ये राहत असून मासे विक्री करत असल्याचे उघडकीस आले. त्याने पोलीस असल्याची बतावणी करुन या तरुणाची फसवणुक करण्याच प्रयत्न केला होता. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अशाच प्रकारे एका तरुणाची फसवणुक केली होती. त्यावेळेस तो पळून गेला होता. त्याच्या अटकेने अशा दोन गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page