नोकरीच्या आमिषाने एकाच कुटुंबातील सातजणांची फसवणुक

45 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपीक, लिपीक आणि शिपाई पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील सातजणांची दोन ठगांनी सुमारे 45 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोन्ही ठगाविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कैलास चोखा किर्तने आणि योगेश जगन्नाथ पाटणकर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही नवी मुंबईचे रहिवाशी आहे. या दोघांनी नोकरीसह घराच्या आमिषानेही अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

62 वर्षांचे दिलीप बाबू होवाळ हे विक्रोळीतील टागोरनगर परिसरात राहत असून ते गोदरेज कंपनीतून निवृत्त झालेआहेत. त्यांची पत्नी सुलोचना हिचे एमए तर सतरा वर्षांचा मुलगा आकाश याचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. गोदरेज कंपनीत असताना 2018 साली तंची कैलास किर्तनेशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने त्याच्या सातारा येथील गावचा योगेश पाटणकर हा मंत्रालयात एका मंत्र्याचा सचिव म्हणून असून सार्वजनिक बांधकाम विभागात त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना लिपीक आणि शिपाई पदावर नोकरीवर लावले आहे.

नोकरीसाठी किमान बारावी आणि दहावी पास असणे आवश्यक असून लिपीक पदासाठी सहा तर शिपाई पदासाठी साडेचार लाख द्यावे लागतात. काही दिवसांनी त्याने त्यांची योगेशशी ओळख करुन दिली होती. चौकशीदरम्यान त्यांना योगेश हा मंत्रालयात सचिव म्हणून काम करत असल्याची खात्री पटली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांकडे त्यांच्या पत्नीसह मुलाला लिपीक पदासाठी नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. एप्रिल 2019 रोजी या दोघांना त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यांना बारा लाख रुपये दिले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांची भाची सुभांगी सचिन होवाळ, श्वेता दादासाहेब वाघमारे, स्मिता दादासाहेब वाघमारे, भाचा अभय पांडुरंग किर्तने, स्वप्निल दादासाहेब वाघमारे यांच्यासाठी नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करुन त्यांच्यासाठी त्यांना 33 लाख 50 हजार रुपये दिले होते.

अशा प्रकारे एप्रिल 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत त्यांनी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि भाची आणि भाच्यासाठी त्यांनी आतापर्यंत 45 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही त्यांनी त्यापैकी कोणालाही नोकरी मिळवून दिली नव्हती. दिलीप होवाळ हे सतत नोकरीविषयी पाठपुरावा करुन त्यांच्याकडे विचारणा करत होते, मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. दोन वर्षांत कोणालाही नोकरी न मिळाल्याने हताश होऊन त्यांनी त्यांच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या 45 लाख 50 हजाराची मागणी सुरु केली होती. यावेळी या दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन पैसे किंवा नोकरी मिळणार नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली होती.

या धमकीनंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. नोकरीच्या आमिषाने या दोघांनी त्यांच्या पत्नीसह सातजणांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी विक्रोळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कैलास किर्तने आणि योगेश पाटणकर या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या दोघांनी नोकरीसह घराच्या आमिषानेही अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना गंडा घातला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page