नामांकित बँकेत नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणुक

नोकरीसाठी तीन खाजगी अ‍ॅपद्वारे कर्ज काढून पैशांचा अपहार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरातील दोन नामांकित बँकेत कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची तिच्याच परिचित व्यक्तीने सुमारे पाच लाखांना गंडा घातल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. नोकरीसाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून त्याने तिच्या मोबाईलवरुन तीन खाजगी अ‍ॅपद्वारे कर्ज करुन कर्जाच्या पैशांचा अपहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिनेश दिलीप देसाई या परिचित भामट्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दिनेशने अशाच प्रकारे इतर काही लोकांची नोकरीच्या आमिषाने फसवणुक केल्याचे बोलले जात असून त्याचा पोलीस तपास करत आहेत.

प्रणाली प्रज्ञेश भोजणे ही 31 वर्षांची महिला नवी मुंबईतील सानपाडा परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिचा भाऊ सिद्धेश अनंत गवळी आणि दिनेश देसाई हे मित्र असून ते दोघेही एकमेकांच्या तीन वर्षांपासून परिचित आहेत. प्रणाली ही पूर्वी एका खाजगी बँकेत कामाला असताना दिनेश हा दुसर्‍या खाजगी बँकेत कामाला होता. त्यातून त्यांची ओळख झाली होती. एक वर्षांपूर्वी तिने वैयक्तिक कारणावरुन बँकेची नोकरी सोडून दिली होती. त्यानंतर ती घरीच होती. यावेळी दिनेशने तिला शहरातील दोन नामांकित बँकेपैकी एका बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती.

मात्र तिची वैयक्तिक बचत संपल्याने तिला त्याला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने बँकेतील नोकरी मिळाल्यानंतर त्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने तिला एका खाजगी बँकेतून कर्ज काढण्यास प्रवृत्त करुन तिला कर्ज काढण्यासाठी तोच स्वत मदत करणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने तिच्या मोबाईलवरुन एक अ‍ॅप डाऊनलोड करुन कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर 11 जून 2024 रोजी तिला क्रेडिट बी या अ‍ॅपद्वारे 97 हजार 105 रुपयांचे, दुसर्‍या दिवशी फाईब या अ‍ॅपद्वारे 2 लाख 40 हजार 987 रुपयांचे आणि तिसर्‍या स्लाईस या अ‍ॅपद्वारे 1 लाख 67 हजार 900 रुपयांच्या कर्जाची रक्कम प्राप्त झाली होती.

ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली होती. नोकरीसाठी किमान पाच लाख रुपये भरावे लागतील असे दिनेशने तिला सांगितले होते, त्यामुळे तिने कर्जाच्या रक्कमेतून त्याला पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर त्याने तिला काही दिवसांतच एका नामांकित बँकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला नोकरी दिली नाही. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल फोन बंद येत होता. त्यामुळे ती त्याच्या खार येथील जवाहरनगर, कांतीलाल कंपाऊंड, भोला दत्ता चाळीतील घरी गेली होती. यावेळी तिला दिनेश त्याच्या घरी सापडला नाही.

काही दिवसांनी तिने कॉल केल्यानंतर त्याने तिला पाच लाख रुपये देण्याची हमी दिली. मात्र त्याने तिला पैसे दिले नाही. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल कायमचा बंद केला होता. नामांकित बँकेत नोकरीचे आमिष दाखवून, नोकरीसाठी तीन वेगवेगळ्या खाजगी अ‍ॅपद्वारे कर्ज काढण्यास प्रवृत्त करुन कर्जाच्या पाच लाखांचा अपहार करुन दिनेशने तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दिनेश देसाई याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दिनेश देसाई याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page