बँकेत सिनिअर मॅनेजर म्हणून नोकरीचे बोगस पत्र पाठवून महिलेची फसवणुक

फसवणुकीप्रकरणी चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – बँक ऑफ अमेरिका या नामांकित बँकेत सिनिअर मॅनेजर म्हणून निवड झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र पाठवून रजिस्ट्रेशनसह विविध कारणासाठी एका महिलेकडून 11 लाख 28 हजार रुपये घेऊन तिची चार अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या चारही सायबर ठगाविरुद्ध पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. खाजगी संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज करणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

सविता राजेश बंगेरा ही 43 वर्षांची महिला मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत राहते. तिचे पती भिवंडीतील तर ती मुलुंडच्या एका खाजगी कंपनीत कामला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती नवीन नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिने एका खाजगी संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज केला होता. 3 डिसेंबरला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो इनडिडमधून अभिनव मिश्रा बोलत असल्याचे सांगून त्याला तिचा बायोडेटा एका संकेतस्थळावरुन प्राप्त झाल्याचे सांगितले.

यावेळी त्याने तिला बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक आणि बेल्स फारगो या नामांकित बँकेत नोकरी असल्याचे सांगून तिला बँक ऑफ अमेरिका बँकेत काम करण्यास इच्छुक आहात याबाबत विचारणा केली होती. तिने होकार देताच त्याने तिला 5 हजार 850 रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला ऑनलाईन ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. दुसर्‍या दिवशी तिला बँकेचे प्रमुख अधिकारी अनुपम चक्रवर्ती नाव सांगणार्‍या व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तिची ऑनलाईन मुलाखत घेतली. त्यानंतर त्याने तिची बँकेच्या सिनिअर मॅनेजर या पदावर निवड झाल्याचे सांगितले.

तिची निवड झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र पाठवून त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तिचे काही दस्तावेज पाठविण्यास सांगून त्याची पडताळणीसाठी 29 हजार 950 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला तिचे सर्व वैयक्तिक, शैक्षणिक दस्तावेजासह संबंधित रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर तिला अभिनव मिश्रा कॉल करुन वेगवेगळ्या कामासाठी पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते. ही रक्कम ती नोकरीवर रुजू झाल्यानंतर परत मिळेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने त्याला टप्याटप्याने 3 डिसेंबर 2025 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत 11 लाख 28 हजार 661 रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते.

यावेळी त्याने तिला काही दिवसांत नोकरीवर रुजू व्हावे लागेल असे सांगून कॉल बंद केला होता. बरेच दिवस उलटूनही नोकरीबाबत त्यांचा कॉल आला नाही. त्यामुळे तिने अभिनव मिश्राला कॉल केला, यावेळी तिला त्याचा कॉल बंद येत होता. तिने त्याला वारंवार कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. नोकरीच्या आमिषाने अज्ञात सायबर ठगाने तिची फसवणुक केल्याचे लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह पूर्व प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीच्या आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. तिने पैसे पाठविलेल्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असून या माहितीच्या आधारे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page