नोकरीसह व्हिसाच्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा
हॉस्पिटलमध्ये न पाठविता कोंबडी फार्ममध्ये कामावर ठेवले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – नोकरीसह व्हिसासाठी घेतलेल्या सुमारे पावणेनऊ लाखांचा अपहार करुन सात बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहम्मद अबुतालिब सय्यद या आरोपीविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीची बतावणी करुन सातपैकी पाचजणांना सौदी अरेबियामध्ये पाठवून हॉस्पिटलमध्ये नोकरी न देता कोंबडी फार्ममध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामावर ठेवून एक महिन्यानंतर त्यांना पुन्हा भारतात पाठविले तर दोघांना नोकरीसाठी सौदीला न पाठवता त्याचे पासपोर्ट स्वतकडे ठेवून मोहम्मद अबुतालिबने या सातजणांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मोहम्मद सय्यदुर रेहमान मोहम्मद अब्दुल हमीद हा 41 वर्षांचा तक्रारदार चालक असून चिंचबंदर परिसरात राहतो. नोव्हेंबर 2023 रोजी त्याची मोहम्मद अबुतालिबशी ओळख झाली होती. जे. जे मार्ग, बाबूला ट्रंक, क्रास रोड, निळू कंपाऊंडमध्ये त्याच्या कंपनीचे एक कार्यालय आहे. मोहम्मद सय्यदुरला त्याने विदेशात नोकरीचे आमिष दाखविले होते. सौदी अरेबिया येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात कामगाराची गरज असून त्यांच्या नोकरीसह व्हिसाचे काम करुन देतो असे सांगितले. त्यामुळे मोहम्मद सय्यदुरने त्याच्या दोन्ही भावासह इतर पाच नातेवाईकांसाठी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. नोकरीसह व्हिसासाठी त्याला पावणेआठ लाख रुपये दिले होते.
काही महिन्यानंतर त्याने त्याचे पाच नातेवाईक मोहम्मद सरीम अहमद, राशिद अहमद, मोहम्मद इस्माईल अली, मोहम्मद जमालुद्दीन आणि मोहम्मद बदरुद्दीन फारुख अहमद यांना सौदी अरेबियाच्या रियाध शहरात पाठविले होते. मात्र तिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये नोकरी न देता एका कोंबडी फार्ममध्ये साफसफाईचे कामाला लावले होते. त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्याने त्यांनी जवळपास एक महिना कोंबडी फार्ममध्ये नोकरी केली होती. एक महिन्यानंतर या पाचजणांना नोकरीवरुन काढून पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार मोहम्मद सय्यदुरला सांगितला.
अशा प्रकारे मोहम्मद अबुतालिबने त्याचे भाऊ रियाजुल अहमद आणि कमरुल अहमद यांना सौदी अरेबिया येथे न पाठविता त्यांचे पासपोर्ट घेतले होते आणि इतर पाच नातेवाईकांना सौदीला पाठवून त्यांना हॉस्पिटलमध्ये नोकरी न देता कोंबडी फार्ममध्ये सफाईच्या कामावर ठेवून एक महिन्यानंतर त्यांना पुन्हा भारतात पाठविले होते. नोकरीसह व्हिसासाठी घेतलेल्या पावणेआठ लाखांचा अपहार करुन या सर्वांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्याने मोहम्मद अबुतालिबविरुद्घ जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल वारंगुळे करत असून पळून गेलेल्या मोहम्मद अबुतालिबचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.