विदेशात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणुक

मालाडच्या कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावून आरोपींचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – मालाड परिसरात विदेशात नोकरीच्या आमिषाने अनेक बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस व्हिसा आणि नियुक्तीचे पत्र देऊन मालाडच्या एका खाजगी कंपनीला टाळे लावून सर्व आरोपींनी पलायन केले असून या आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अअकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोाहीम हाती घेतली आहे. दरम्यान नोकरीच्या आमिषाने फसवणुक झालेल्या 38 बेरोजगार तरुणांनी आतापर्यंत पोलिसांत तक्रार केली असून आगामी काळात आणखीन काही तरुण तक्रारीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

मालाडच्या एका शॉपिंग मॉलमध्ये संबंधित आरोपीने स्वतची एक बोगस कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीने सोशल मिडीयावर विदेशात विविध पदासाठी मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीसोबत एक लिंक देण्यात आली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर अनेकांनी त्यात चांगले रिव्ह्यू दिल्या होत्या. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर शहरातील अनेक बेरोजगार तरुणांनी ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्षात कंपनीत येऊन विदेशातील संबंधित नामांकित हॉटेलमध्ये किचन स्टाफ, वाहनचालक, हाऊसकिपिंग, स्टोअर किपर, सुरक्षारक्षक आदी पदांसाठी अर्ज केले होते. या अर्जासोबत त्यांचे पासपोर्ट जमा करुन प्रोसेसिंग फी, नोंदणी शुल्क, व्हिसा, मेडीकलसह इतर कामासाठी कंपनीच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते.

काही दिवसांनी ठराविक तरुणांना व्हिसासह नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. या व्हिसासह नियुक्ती पत्राची शहानिशा केल्यानंतर त्यांना देण्यात आलेले दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या बेरोजगार तरुणांनी मालाडच्या कंपनीत धाव घेतली होती, मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना कंपनीच्या कार्यालयाला टाळून सर्व आरोपी पळून गेल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर जवळपास 38 तरुणांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. प्रत्येक उमेदवाराकडून नोकरीसाठी साडेचार ते पाच लाख रुपये घेण्यात आले होते. अशा प्रकारे कंपनीने अनेक उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये घेतले होते.

मात्र कोणालाही नोकरी न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यापैकी काही उमेदवारांना पूर्ण रक्कम तर काहींना अर्धी रक्कम देण्यातआली होती. काहींना पैसे न देता ते सर्वजण पळून गेले होते. या उमेदवारांच्या जबानीनंतर पोलिसांनी कंपनीच्या संबंधित आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page