नोकरीसह फ्लॅटच्या आमिषाने दोन बंधूंची 20 लाखांची फसवणुक

फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
मुंबई, – नोकरीसह फ्लॅटच्या आमिषाने दोन बंधूंची सुमारे 20 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुकूल महादेव दळवी ऊर्फ अभय पाटील या मुख्य आरोपीविरुद्ध आरे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीने अशाच प्रकारे फ्लॅटसह नोकरीच्या आमिषाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

श्रीकांत चंद्रकांत गायकवाड हे गोरेगाव येथील आरे कॉलनीतील रहिवाशी आहेत. ते एका खाजगी कंपनीत कामाला असून कंपनीने त्यांना आरे कॉलनीत पाणी सोडण्याचे काम सोपविले होते. त्यांच्याच शेजारी महेश नायक हा त्यांचा मित्र असून त्याच्याकडे मुकूल हा नेहमी येत होता. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. मुकूलने तो मुलुंडच्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला असल्याचे सांगितले होते. या कंपनीत नोकरी भरती असून त्याची तिथे चांगली ओळख आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना तिथे नोकरी मिळवून दिली आहे असे सांगितले होते. त्यामुळे श्रीकांत यांनी त्यांच्यासह त्यांच्या भावाला नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी त्याला 25 हजार रुपये दिले होते. मात्र त्याने त्यांना नोकरी दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.

याच दरम्यान जून 2022 रोजी सिडकोने नवी मुंबईतील काही फ्लॅटच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यावेळी त्याने सिडकोमध्ये त्याचे भावोजी कामाला असून त्यांच्या मदतीने त्यांना सिडकोमध्ये स्वस्तात रुम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने भावोजीच्या नावावर त्यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. अशाच प्रकारे त्याने म्हाडामध्येही फ्लॅटच्या विक्रीची जाहिरात आली असून तिथेही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले होते. त्यामुळे श्रीकांत यांनी त्यांच्या भावासाठी म्हाडाच्या फ्लॅटसाठी त्याला पैसे दिले होते. ही रक्कम त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

अशा प्रकारे त्याने त्यांच्याकडून नोकरीसह म्हाडा आणि सिडकोच्या स्वस्तातील फ्लॅटसाठी टप्याटप्याने वीस लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना नोकरी दिली नाही किंवा म्हाडा व सिडकोच्या घराचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तो त्यांना टाळू लागला होता. सतत पैशांची विचारपूस होत असल्याने त्याने त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करुन स्वतचा मोबाईल बंद केला होता.

अलीकडेच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली होती. मुकूल दळवीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी मुकूलची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page