मनपा, एमएमआरडीए-मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीच्या नावाने गंडा
नोकरीसाठी दहा लाखांचा अपहार करणार्या दुकलीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मार्च २०२४
मुंबई, – महानगरपालिका, एमएमआरडीए आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात चांगली ओळख असल्याची बतावणी करुन कायमस्वरुपी नोकरी मिळवून देतो असे सांगून एका ३० वर्षांच्या तरुणाची सुमारे दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निनाद प्रशांत केळसकर आणि संतोष गजानन केळसकर या दोघांविरुद्ध गावदेवी पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी नोंदविला आहे.
कमलेश बाळासाहेब वाबळे हा ३० वर्षांचा तरुण ताडदेव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात होता. याच दरम्यान त्याची त्याचा परिचित जोगेश्वरीतील सहकार रोड, हनुमान मंदिराजवळील लखाई यादव चाळीत राहणार्या निनाद केळसकर याच्याशी ओळख झाली होती. चर्चेदरम्यान त्याने त्याच्या नोकरीबाबत त्याला सांगितले होते. यावेळी निनादने त्याला महानगरपालिका, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि एमएमआरडीए येथे नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. त्याच्या परिचित संतोष केळसकर याची या तिन्ही विभागात चांगली ओळख आहे. तोच त्याला त्यापैकी एका ठिकाणी नोकरी देईल असे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही जोगेश्वरीच्या बाबू बागुल चाळीत राहणार्या संतोषला भेटण्यासाठी गेले होते. संतोषने त्याला नोकरीचे आश्वासन देत त्यासाठी काही खर्च येईल असे सांगून त्याच्याकडून सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ८ लाख ४० हजार लाख कॅश स्वरुपात तर त्याच्या बँक खात्यात १ लाख ९० हजार असे १० लाख ३० रुपये दिले होते. नोव्हेंबर २०२२ रोजी संतोषने त्याला महानगरपालिकेत नोकरीसाठी प्रोफाईल तयार झाले असून त्याची एक झेरॉक्स प्रत दिली. ही प्रत महानगरपालिकेच्या लेटरपॅडवर असून त्यावर सहाय्यक अभियंताची सही असल्याचे सांगितले.
वरिष्ठ अधिकार्यांची स्वाक्षरी झाली की त्याला महानगरपालिकेत नोकरी मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याला नोकरी दिली नाही. विचारणा केल्यानंतर निनाद आणि संतोष त्याला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याने नोकरीचा विषय सोडून दिला होता. त्याने त्यांच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली. मात्र त्यांनी त्याला पैसे परत न करता या पैशांचा अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्याने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निनाद केळसकर आणि संतोष केळसकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी मनपाच्या नोकरीचे बोगस दस्तावेज बनवून नोकरीसाठी घेतलेल्या दहा लाख तीस हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.