लंडनमध्ये नोकरीसह वर्क व्हिसाच्या नावाने 27 लाखांची फसवणुक
नेपाळी नागरिकाची फसवणुक करणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – लंडनमध्ये नोकरीसह वर्क व्हिसा देण्याच्या बहाण्याने एका नेपाळी नागरिकाची सुमारे 27 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या मालकासह त्याच्या सहकारी महिला कर्मचार्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रोहित सोनगरा आणि आकांक्षा तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. यातील रोहित हा मालाड तर आकांक्षा ही कांदिवलीची रहिवाशी आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विकास विदुरकुमार खतिवडा हे मूळचे नेपाळचे रहिवाशी असून सध्या आग्रीपाडा येथील फारुख भाई रोडवर राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यांत त्यांची रोहित आणि आकांक्षा यांच्याशी ओळख झाली होती. कांदिवलीतील रघुलिला मॉलमध्ये रोहितची अचिव इंटरनॅशनल कंपनी असून याच कंपनीत आकांक्षा ही व्हिसा कॉन्सलर म्हणून कामाला आहे. त्यांच्यातील भेटीत त्यांनी विकासला त्याच्या पत्नीला लंडनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्या नोकरीसह कायमचा व्हिसा मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडे नोकरीसह व्हिसासाठी काही पैशांची मागणी केली होती.
लंडनमध्ये कायमची नोकरीसह वर्क व्हिसा मिळत असल्याने त्यांनीही त्यांना पत्नीच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना जून 2024 ते मे 2025 या कालावधीत टप्याटप्याने 27 लाख 44 हजार 132 रुपये दिले होते. ही रक्कम ऑनलाईनसह कॅश स्वरुपात देण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून सुमारे चौदा लाख रुपये उसने घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला नोकरी मिळवून दिली नाही किंवा तिचा वर्क व्हिसा दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे नोकरीसह व्हिसासाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली होती,
मात्र या दोघांनी त्यांनी दिलेल्या पैशांचा पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोहित सोनगरा आणि आकांक्षा तिवारी यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांना या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी विदेशात नोकरीसह वर्क व्हिसाच्या नावाखाली इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.