मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – रिक्षाच्या धडकेने एका ४५ वर्षांच्या स्विमिंग कोचचा मृत्यू झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. विनित रामचंद्र देसाई असे या कोचचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळाहून पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. थर्स्टी फर्स्टच्या मध्यरात्री विनित देसाईच्या अपघाताची मृत्यूची माहिती समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
हा अपघात बुधवारी रात्री मध्यरात्री सव्वाच्या सुमारास जोगेश्वरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी बसस्टॉपजवळील नॉर्थ बॉण्डवर झाला. ७५ वर्षांच्या जयश्री रामचंद्र देसाई या जोगेश्वरीतील शंकरवाडी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहतात. मृत विनित हा त्यांचा मुलगा असून तो अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका स्विमिंगमध्ये कोच म्हणून कामाला होता. ३१ डिसेंबरा तो नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता कामासाठी निघाला होता. रात्री उशिरा सव्वाच्या सुमारास तो शंकरवाडी बसस्टॉपजवळ रस्ता क्रॉस करत होता. यावेळी अंधेरी येथून बोरिवलीच्या दिशेने भरवेगात जाणार्या एका रिक्षाने त्याला धडक दिली होती. त्यात त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर रिक्षाचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रात्री तीन वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जयश्री देसाई यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर रिक्षाचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.