पाण्याच्या टँकरच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

अपघाताला जबाबदार असलेल्या चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या टँकरच्या धडकेने एका 63 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी जोगेश्वरी परिसरात घडली. आशा दत्ताराम जाधव ऊर्फ दिपा असे अपघातात मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी आरोपी टँकरचालक अंगदकुमार जुगलकिशोर यादव याला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तपासात अंगदकुमार हा मोबाईलवर बोलत टँकर चालवत असल्याने त्याला स्कूटरचा अंदाज आला नाही आणि त्यातून हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.

हा अपघात सोमवारी दुपारी पाऊण ते एकच्या दरम्यान जोगेश्वरीतील सोसायटी रोड, जेईएस स्कूल गेटसमोर झाला. आदित्य अशोक जाधव हा तरुण जोगेश्वरीतील नटवरनगर रोड क्रमांक पाच, विमल अपार्टमेंटमध्ये राहतो. मृत आशा जाधव या त्याची चुलत काकी असून ती त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या यशवंत पाचाळ चाळीत तिचा मुलगा सुरज याच्यासोबत राहते. सोमवारी त्याची काकी काकाच्या श्राद्ध कार्यक्रमासाठी त्याच्या घरी आली होती. कार्यक्रम संपल्यानंतर तो काकीला तिच्या घरी सोडण्यासाठी भावाच्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरुन जात होता. दुपारी पाऊणच्या सुमारास त्यांची स्कूटर जेईएस स्कूल गेटसमोरुन जात होती.

यावेळी भरवेगात जाणार्‍या एका पाण्याच्या टँकरने त्यांच्या स्कूटरला मागून जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही स्कूटरवरुन खाली पडले. अपघातात जखमी झालेल्या आशा जाधव यांना तातडीने स्थानिक लोकांनी जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आदित्य जाधव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी टँकरचालक अंगदकुमार यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तपासात अंगदकुमार हा टँकर चालविताना मोबाईलवर बोलत होता. त्यामुळे त्याचे स्कूटरवर लक्ष नव्हते. मोबाईलवर बोलत असल्याने त्याला स्कूटरचा अंदाज आला आणि त्याने त्याच्या स्कूटरला धडक दिल्याचे तपासात उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अंगदकुमार हा अंधेरीतील एमआयडीसी, शांतीनगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. काकांच्या श्राद्ध कार्यक्रम संपल्यानंतर अपघातात काकीच्या मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page