जोगेश्वरी परिसरातून पाच बांगलादेशींवर कारवाई

दोन अल्पवयीन मुले, एक महिलेसह दोन पुरुषांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – जोगेश्वरी परिसरातून पाच बांगलादेशी नागरिकांवर जोगेश्वरी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात दोन पुरुषांसह एक महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सलीम बलाई मोल्ला, नन्नू अलेक शेख आणि रुख्साना नन्नू शेख अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून ते तिघेही दोन्ही अल्पवयीन मुलांसह नोकरीसाठी भारतात अवैध मार्गाने आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या सर्वांना लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा, एटीएस आणि आय शाखेला देण्यात आले होते. या आदेशानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अशा बांगलादेशी नागरिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईस सुरुवात केली होती. ही माहिती काढताना काही बांगलादेशी नागरिक नोकरीसाठी नियमित जोगेश्वरी परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार, पोलीस निरीक्षक चारु भारती, दत्तात्रय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक विजय ढवळे, पोलीस हवालदार संजीव लांडगे, सुनिल खुंटे, विशाल पिसाळ यांनी जोगेश्वरीतील एममएारडीए कॉलनीसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सलीम मोल्ला याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. तो बांगलादेशातील नरेल, कालियाचा रहिवाशी असून सध्या मिरारोड येथे राहत होता. त्याच्यासोबत इतर एक जोडपे त्यांच्या मुलांसोबत राहत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने मिरारोड येथून नन्नू शेख, त्याची पत्नी रुख्साना शेख आणि आठ आणि पाच वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले होते. ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.

बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून अवैधरीत्या भारतात आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते मिरारोड परिसरात राहत होते. मिळेल ते काम करत करुन स्वतचा उदरनिर्वाह चालवत होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page