वाहन खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक

39 लाखांच्या फसवणुकीप्रकणी बँकेच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची त्याच्याच मित्राने सुमारे 39 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचा एजंट असलेल्या विजय साहेबराव नवले या आरोपीविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विजय नवले हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

सत्यवान वसंत शिंदे हे जोगेश्वरी येथे राहत असून त्यांचा स्पीड पोस्ट एजन्सी सर्व्हिसचा व्यवसाय आहे. जोगेश्वरी येथे त्यांच्या श्रीजी इंटरप्रायझेस कंपनीचे एक कार्यालय आहे. या कामासाठी त्यांना बाईकसह इतर वाहनांची गरज असते. त्यामुळे त्यांनी काही वाहने खरेदी केले होते, तीन वर्षांनी ते वाहनांची विक्री करत होते. पाच वर्षांपूर्वी याच वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून त्यांची विजय नवलेशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना तो बँकेचा एजंट असल्याचे सांगितले होते. त्याने त्यांच्या एजन्सीला अनेक वाहने पुरविल्याने काही दिवसांत त्याच्यासोबत त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याने त्यांना वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवसायात आर्थिक गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता.

बॅक ऑक्शनमध्ये असलेल्या वाहनांची खरेदी करुन त्याची विक्री करायची. त्याला या कामाचा चांगला अनुभव आहे. त्याचा अनुभव आणि त्यांच्या आर्थिक मदतीच्या जोरावर त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड फायदा होईल असे भासवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्यासोबत व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला बँक ऑक्शनमधील वाहने खरेदीसाठी मार्च ते डिसेंबर 2021 या कालावधीत टप्याटप्याने 39 लाख 59 हजार 142 रुपये दिले होते. या पैशांतून त्याने काही वाहने खरेदी केले होते, त्याचा व्यवहार आणि तपशील त्याने त्यांना दिले होते. खरेदी केलेले काही वाहने त्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर पार्क केल्या होत्या. मात्र या वाहनांची विक्री करुन त्याने त्यांना कुठलाही मोबदला दिला नाही.

याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. अनेकदा तो कार्यालयाबाहेर पार्क केलेले वाहने त्यांना न विचारता घेऊन जात होता. याच दरम्यान त्यांना विजय नवलेने इतर काही लोकांसोबत अशाच प्रकारे वाहनांचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना वाहन दिले नाही, त्यातून त्यांना कुठलाही मोबदला नाही. या वाहनांवर होणारा फायदा तो स्वत घेत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते त्याच्या घरी गेले होते. यावेळी विजय तिथे भाड्याने राहत असल्याचे तसेच काही दिवसांपासून तो घर खाली करुन निघून गेल्याचे समजले होते. त्यानंतर त्याचा त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता.

बॅक ऑक्शनमधील वाहने खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणुक करण्यास सांगून त्याने त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जोगेश्वरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विजय नवले याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page