जनार्दन ज्वेलर्समधील घरफोडीप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक
आरोपीकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत जोगेश्वरीतील जनार्दन ज्वेलर्स दुकानात झालेल्या पावणेनऊ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घरफोडीप्रकरणी एका मुख्य वॉण्टेड आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. अनिल सिंग ऊर्फ त्रिशुलसिंग सुधान असे या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत सुनिलसिंग दुधानी, राजेशसिंग दुधानी, अश्विनसिंग दुधानी आणि अनिलकुमार सोनी या चौघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अनिल सिंग हा वॉण्टेड आरोपी होता, अखेर त्याला चार महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सोमवार 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचे उर्वरित दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिखलकर यांनी सांगितले.
दिप्ती दिलीप धारगळकर ही महिला विलेपार्ले येथे राहत असून तिचे पती आणि मुलगा सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. जोगेश्वरीतील सुभाष रोडवर, सॅटेलाईट पार्कमध्ये तिच्या मालकीचा जनार्दन ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. या दुकानात सोन्या-चांदीच्या विक्रीसह दागिने दुरुस्तीचे काम चालते. तिच्याकडे छोटू जाना आणि गणेश करंजवकर हे दोघेही कामगार म्हणून कामाला आहेत. 10 नोव्हेंबर 2025 रोजी शॉपमधील दिवसभरातील काम संपल्यानंतर ती ज्वेलर्स शॉप बंद करुन घरी गेली होती. दुसर्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता तिला तिच्या परिचित भगवतीलाल जैन यांनी कॉल केला होता. तिचे ज्वेलरी शॉपचे शटर तुटलेले असून काचा फुटलेल्या आहेत. शॉपमध्ये चोरी झाल्याचा संशय व्यक्त करुन त्याने तिला तिथे बोलाविले होते. त्यामुळे ती लागलीच शॉपच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडेनऊ वाजता ती शॉपमध्ये आली असता तिला तिच्या शॉपमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले.
रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने शॉपचे कुलूप तोडून, काचा फोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर शॉपमधील विविध सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पावणेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने जोगेश्वरी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिप्ती धारगळकर हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. दुकानासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना जोगेश्वरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने सुनिलसिंग, राजेशसिंग, अश्विनसिंग आणि अनिलकुमार या चार संशयितांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी त्यांच्या इतर दोन सहकार्यांच्या मदतीने जनार्दन ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यांच्या चौकशीतून अनिलसिंग व अन्य एका आरोपीचे नाव समोर आले होते. या चौघांच्या अटकेनंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अनिल सिंग याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचाही या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्याला अटक करुन शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी चार आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिने हस्तगत केले होते. उर्वरित दागिने अनिलसिंग याच्याकडे होते, त्यामुळे त्याच्याकडून चोरीचे उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे.