एकांकी जीवन जगणार्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येने खळबळ
हत्या परिचित व्यक्तीने केल्याचा प्राथमिक अंदाज
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – पतीच्या निधनानंतर एकांकी जीवन जगणार्या एका 68 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. हवाबी दलावी असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिची हत्या तिच्याच परिचित व्यक्तीने केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
हवाबी दलावी ही महिला जोगेश्वरीतील झुला मैदान परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये एकटीच राहत होती. तिच्या पतीचे निधन झाले होते. तिला दोन मुली असून या दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. तिची एक मुलगी रत्नागिरी तर दुसरी पुण्यात राहते. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हवाबी या त्यांच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांच्या गळ्याभोवती दोरी होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच शेजार्यांनी ही माहिती मेघवाडी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हवाबी यांना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तिची हत्या बारा तासापूर्वीच झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन तिची दोरीने गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर आरोपी घरातून पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हवाबीच्या परिचित असून तिनेच त्याला घरात घेतले असावे. ही संधी मिळताच त्याने तिची हत्या करुन पलायन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.