मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गुंतवणुकीच्या नावाने एका व्यावसायिकाची सुमारे ४० लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी अक्षय नरेंद्रप्रसाद श्रीवास्तव या मुख्य आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. अक्षय हा दिल्लीतील नोएडाच्या ऑल स्पार्क कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक आहे. या गुन्ह्यांत सलोनी श्रीवास्तव आणि राफेल खान हे दोघेही सहआरोपी असून या तिघांनी गुंतवणुकीच्या नावाने आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते.
३८ वर्षांचे तक्रारदार भाईंदर येथे राहत असून व्यावसायिक आहेत. त्यांची पार्टनरशीपमध्ये एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी इमारत पुर्नविकासाचे काम करते. एप्रिल २०२३ रोजी ते त्यांच्या पार्टनर महिलेसोबत दिल्लीला गेले होते. यावेळी महिलेच्या पतीने त्यांची ओळख अजय अहलावतशी झाली होती. त्याने ऑल स्पार्क कॅब प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. कंपनीचे संचालक अक्षय श्रीवास्तवची भेट घेतल्यानंतर त्यांना कंपनीची गुंतवणुकीची योजना सांगितली होती. त्यात कंपनी ऑटो ई रिक्षा तयार करुन त्या रिक्षा विक्री करते. काही ग्राहक रिक्षा खरेदी करत असून काहीजण रिक्षा भाड्याने घेतात. त्याचा मोबदला कंपनीला मिळत असून नफ्याची रक्कम सर्वांना समान वाटप केले जाते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. करारानंतर त्यांनी कंपनीत ४० लाखांची गुंतवणुक केली होती.
मात्र काही महिने उलटूनही त्यांनी नफ्याची रक्कम दिली नाही तसेच कराराचे कागदपत्रे पाठवून दिली नव्हती. विचारणा केल्यानंतर अक्षय, सलोनी आणि राफेल खान हे तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सीएच्या मार्फत कंपनीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना या कंपनीने अनेकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले असून गुंतवणुकीचे पैसे योग्य कारणासाठी वापरले नाही. त्यांच्यात कागदपत्रांत अनेक विसंगती आढळून आले. अक्षय आणि सलोनी यांनी परस्पर रक्कम काढली होती. त्याचा कुठलाही हिशोब नव्हता. त्यामुळे त्यांनी आरोपींकडून गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र या आरोपींनी पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अक्षय, सलोनी आणि राफेल या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या कंपनीचा संचालक अक्षय श्रीवास्तवला तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.