कामाच्या तिसर्या दिवशी चोरी करणार्या केअरटेकर तरुणीला अटक
पावणेआठ लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कामाच्या तिसर्या दिवशी चोरी करणार्या एका 27 वर्षांच्या केअरटेकर तरुणीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. सपना नानकचंद चौधरी असे या आरोपीचे तरुणीचे नाव असून तिच्यावर पावणेआठ लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे. तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
शिला सोहन माली ही महिा जोगेश्वरी येथे राहत असून तिचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. तिच्या मालकीचे मालाड येथे हॉट फॅशन नावाचे एक शॉप असून तिच्या व्यवसायात तिला तिचे पती सोहल माली हे मदत करतात. तिची सासू कनिका माली हिचे गुडघ्याचे ऑपरेन झाले आहे. त्यामुळे सासूसह मुलांचा सांभाळ करण्याठी त्यांनी शौम्य हेल्थ केअर इंडिया कंपनीकडून सपना चौधरी हिला त्यांच्या घरी केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. सपना ही खार येथे राहत असून 14 फेब्रुवारीपासून त्यांच्या घरी कामावर हजर झाली होती. तिच्या कामाची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ असा होता. सोमवारी
16 फेब्रुवारीला कनिका माली हिने तिचे सुमारे पावणेआठ लाखांचे विविध सोन्याचे दागिने लाकडी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. मात्र दुसर्या दिवशी तिला तिचे दागिने सापडले नाही. रात्री साडेनऊ वाजता शिला आणि सोहन माली हे घरी आले होते. यावेळी त्यांना कनिकाने ही माहिती सांगून घरातील सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी घरात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच दागिने सापडले नाही.
त्यांच्या घरी सपना चौधरी वगळता कोणीही येत नव्हते. त्यामुळे तिनेच काम करताना घरात हातसफाई करुन पावणेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन शिला माली हिने तिच्याविरुद्ध जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. याच गुन्ह्यांत सपनाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर तिला बुधवारी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.