मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – गेल्या काही दिवसांत पोलिसांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच एका कारवाईदरम्यान दोन गटातील भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या एका पोलीस हवालदारावर चारजणांच्या टोळीने हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश विजयानंद खडपे, प्रशांत मनोज पाटील, अनिकेत भरत कोचरेकर आणि सिद्धांत सिताराम भोर अशी या चौघांची नावे असून ते जोगेश्वरीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ही घटना रविवारी रात्री उशिरा दिड वाजता जोगेश्वरीतील मेघवाडी, पोस्ट ऑफिससमोरील आदर्श मेघवाडी एसआरए सोसायटीमध्ये घडली. विजय भिंगारदिवे हे वरळी पोलीस वसाहतीत राहत असून सध्या मेघवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री उशिरा रुची राणे आणि अनिकेत तावडे यांना संबंधित आरोपी शिवीगाळ करुन मारहाण करत होते. या चारही आरोपींनी मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन करुन ते चौघेही परिसरात धिंगाणा घालत होते.
ही माहिती प्राप्त होताच विजय भिंगारदिवे हे त्यांचे दोन सहकारी पोलीस हवालदार सचिन खरात आणि शिवाजी चव्हाण यांच्यासोबत घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी शिवीगाळ करुन मारहाण करणार्या तरुणांना शांत राहण्यास सांगून त्यांच्यात भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. इतकेच नव्हे तर बाहेर भेट तुला दाखवतो अशी धमकी दिली होती.
चारही आरोपी प्रचंड आक्रमक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करुन चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.