28 वर्षांच्या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीवर गुन्हा
ब्लॅकमेल करुन दबाब आणून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – जोगेश्वरी येथे राहणार्या सचिन मेघजी गाला या 28 वर्षांच्या तरुणाने त्याच्या राहत्या घरी चाकूने गळ्यावर वार करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिनला मुस्कान नावाच्या एका तरुणीने ती गरोदर असल्याचे सांगून त्याच्यावर दबाव आणून, त्याला धर्म परिवर्तनक करण्यास प्रवृत्त करणार असल्याचा चित्र निर्माण करुन ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप त्याच्या भावाने केला होता. त्याच्या जबानीनंतर मुस्कान नावाच्या तरुणीविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सचिनने 26 मार्चला आत्महत्येचा प्रयत्न केला होता, 4 मार्चला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कमलेश मेघजी गाला हे अंधेरी येथे राहत असून ते कापड व्यापारी आहेत. त्यांचा जोगेश्वरी येथे कपडे बनविण्याचा तसेच विक्रीचा व्यवसाय आहे. 22 फेब्रुवारीला ते त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी त्यांना सचिनने एक मॅसेज पाठविला होता. त्यात त्याने त्याला घरी लवकर येण्यास सांगून त्याला महत्त्वाचे बोलायचे आहे असे नमूद केले होते. त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने काही प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरा ते घरी आले होते. यावेळी सचिन घरात नव्हता. विचारणा केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सचिन हा त्याच्या मित्राकडे गेल्याचे समजले. घरी आल्यानंतर त्याने त्यांना त्याचे मुस्कान नावाच्या एका तरुणीसोबत मैत्री होती. तो तिच्याशी नेहमी चॅट करत होता. सुरुवातीला त्याला मुस्कानऐवजी त्याच्याशी दुसराच व्यक्ती चॅट करत असल्याचे वाटले होते. त्याने तिच्याशी कधीही गैरकृत्य केले नव्हते. तिच्यासोबत कुठेही फिरायला गेला नव्हता.
काही दिवसांनी मुस्काने त्याला एका गरोदर महिलेचा रिल पाठविला होता. ही रिल पाठवून मुस्कानने ती त्याच्यापासून गरोदर असून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले. मुस्कानकडून होणार्या दबावामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. मुस्कान त्याला मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी भाग पाडणार असल्याची त्याला सतत भीती होती. 26 फेब्रुवारीला त्यांनी सचिनला मामाशी याविषयी बोलून काहीतरी मार्ग काढू असा सल्ला दिला होता. त्याच दिवशी सचिनने चाकूने स्वतला दुखापत करुन घेतली होती. त्यामुळे त्याला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना सचिनने चाकूने गळ्यावर वार करुन दुखापत केल्याचे समजले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर अंधेरीतील कोकीळाबेन आणि सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्याावर उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान 4 मार्चला दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला होता. सचिनच्या वागण्यातून, बोलण्यातून त्याला मुस्कान नावाची तरुणी वारंवार मानसिक त्रास देत होती. ती गरोदर असल्याचे सांगून त्याच्यावर दबाब आणून ब्लॅकमेल करत होती. त्याचा जबदस्तीने धर्म परिवर्तन करण्याची भीती वाटत होती. त्यातून त्याने स्वतच्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कमलेश गाला यांनी जोगेश्वरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मुस्कानविरुद्ध तक्रार करुन तिचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुस्कानविरुद्ध सचिनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.