मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – हायड्राक्रेन वाहनाच्या धडकेने एका 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी विलेपार्ले परिसरात घडली. बिना अनिल मथुरे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी क्रेन चालक अरविंद कमलेश यादव याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर अरविंद हा घटनास्थळाहून पळून गेला होता. रात्री उशिरा त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जाते.
हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील इर्ला मार्केट, तानाजी मालुसरे मार्ग, प्राईम मॉलसमोर झाला. बिना मथुरे ही महिला विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिसजवळील गणेश मूर्ती गार्डन शोरुमजवळ राहते. गुरुवारी दुपारी ती इर्ला मार्केटमध्ये गेली होती. प्राईम शोरुमसमोरुन जात असताना एका हायड्राक्रेन चालकाने हलगर्जीपणाने गाडी चालवून बिनाला जोरात धडक दिली होती. या अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर क्रेनचालक जखमी महिलेस कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता तेथून पळून गेला होता. त्यामुळे तिला स्थानिक लोकांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस हवालदार नरेंद्र नामदेव तेली यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हायड्राके्रन चालक अरविंद यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने हायड्राक्रेन चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर अरविंद यादव हा पळून गेला होता. त्याला नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अरविंद हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गादीपूरचा रहिवाशी असून सध्या तो गोरेगाव येथील एमएमआरडीए कॉलनीतील गणेश सहकारी सोसायटीमध्ये राहतो.