भरवेगात जाणार्या वाहनाच्या धडकेने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका वाहनाच्या धडकेने 35 ते 40 वयोगटातील पादचार्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची पोलिसांना न देता आरोपी चालक घटनास्थळाहून पळून गेला असून त्याचा जुहू पोलिसाकडून शोध सुरु आहे. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.
हा अपघात रविवारी पहाटे तीन ते पावणेचारच्या सुमारास अंधेरीतील गोखले रोडवरील नूतन लक्ष्मी कॉलनी, दलाल बंगलो, पूर्वेकडील जाणार्या वाहिनीवर झाला. सूर्यकांत सर्जेराव पवार हे वरळी पोलीस कॅम्प परिसरात राहत असून सध्या जुहू पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री उशिरा ते त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक पाठक, पोलीस हवालदार सार्वेडे, पोलीस शिपाई इंगुलकर यांच्यासोबत जुहू मोबाईल व्हॅनवर परिसरात गस्त घालत होते.
गस्त घालताना एमटीडी टँबवर त्यांना मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून एक कॉल प्राप्त झाला होता. त्यात गोखले रोड, नूतन लक्ष्मी कॉलनीजवळ एक अपघात झाला असून पोलीस मदत हवी आहे असा कॉल प्राप्त झाला होता. ही माहिती मिळताच पोलीस नूतन लक्ष्मी, दलाल बंगलोजजवळ पोहचले होते. तिथे पोलिसांना एक 35 ते 40 वयोगटातील व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याच्या छातीवर, दोन्ही हातावर, दोन्ही पायाच्या गुघड्यावर, उजव्या कमरेच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती.
अज्ञात वाहनाच्या धडकेने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आरोपी चालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता.
त्यामुळे पोलीस हवालदार सूर्यकांत पाटील यांच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.