व्यवसायात पार्टनरशीपची ऑफर देऊन वयोवृदध व्यावसायिकाला गंडा
1.60 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 सप्टेंबर 2025
मुंबई, – फार्मासिटीकल प्रोडक्टसाठी लागणारे कॅप्सुल तयार करण्यासाठी पार्टनरशीप ऑफर करुन कंपनीत गुंतवणुक केलेल्या एक कोटी साठ लाख रुपयांचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी व्यावसायिकाविरुद्ध जुहू पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धनेश गुंडेचा असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीकामी जुहू पोलिसांची एक टिम लवकरच नागपूरला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रमेश ज्ञानदास रुघानी हे 74 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जुहू परिसरात राहतात. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी देश-विदेशात फार्मासिटीकल प्रोडक्ट निर्यात करते. कंपनीचे मुख्य कार्याल जुहू येथील जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड, सुप्रिम शॉपिंग सेंटरमध्ये आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या जी. के हेल्थ केअर पार्टनरशीप फर्मचे पार्टनर धनेश गुंडेचा यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले व्यावसायिक मित्र झाले होते. काही महिन्यानंतर धनेश गुंडेचा याने त्यांना त्यांची कंपनी कॅप्सुल प्रोडक्शन करणार असून त्यात त्यांची गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता. कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना त्यांच्यासोबत 25 टक्के पार्टनरशीप ऑफर केली होती.
अल्पावधीत धनेश गुंडेचासोबत चांगली मैत्री झाल्याने त्यांनी त्याच्यासोबत फार्मासिटीकल कॅप्सुलचा पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय होता. डिसेंबर 2022 साली त्यांच्यात एक मेमोरडम अंडरस्टॅडिंग झाले होते. त्यात धनेश गुंडेचा, अनुप कोठारी, अतुल जैन आणि रमेश रुघानी यांच्या कंपनीचे प्रत्येकी 25 टक्के शेअर असल्याचे नमूद करण्यात आले होते. कराराप्रमाणे त्यांना कंपनीत दोन कोटीची गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी धनेश गुंडेचाला कॅप्सुल मशिन खरेदीसह इतर कामासाठी टप्याटप्याने एक कोटी साठ लाख रुपयांचे पेमेंट केले होते.
ही कंपनीत एमओयूप्रमाणे कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र पेमेंट पाठवूनही धनेशने कॅप्सुल प्रोडक्शन मशिन खरेदी केली नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. लवकरच मशिन घेऊन प्रोडक्शनचे काम सुरु होईल असे सांगत होता. मात्र सतत पाठपुरावा करुनही धनेशचे त्याचे आश्वासन पाळले नाही. मात्र व्यवसायात कोणत्याही प्रकारची सुरुवात झाली नसल्याने त्यांनी त्यातून स्वतचे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्मेची मागणी सुर केली होती. मात्र त्याने गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता या रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्याचा वैयक्तिक कारणासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिश केल्यानंतर धनेश गुंडेचा याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी व्यावसायिक धनेश हा नागपूरचा रहिवाशी असल्याने तपासकामी एक टिम लवकरच नागपूरला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धनेशने व्यवसायात पार्टनरशीप ऑफर करुन अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.