विजेचा झटका लागून पहिल्या मजल्यावरुन महिलेचा मृत्यू

कूपर हॉस्पिटलमधील सामानाची नातेवाईकांकडून तोडफोड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – विजेचा झटका लागून पहिल्या मजल्यावरुन पडून साबिया हनीफ शेख या 30 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करुन मृत महिलेच्या पतीसह इतर नातेवाईकांनी कूपर हॉस्पिटलमधील सामानाची तोडफोड केल्याने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आरोपी पतीसह इतर नातेवाईकांविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हनीफ शेख हा त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील जुनैदनगर परिसरात राहत असून तो रिक्षाचालक म्हणून कामाला आहे. मृत साबिया ही त्याची पत्नी आहे. नवीन वर्षांला अवघे तीस मिनिटे बाकी असताना साबियाला विजेचा धक्का लागला आणि ती तिच्या राहत्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरातून खाली पडली होती. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तिचा पती हनीफ शेख व इतर नातेवाईक आणि रहिवाशांनी साबियाला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये नेले होते. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. साबियावर डॉक्टरांनी वेळीच औषधोपचार केले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करुन हनीफसह इतर नातेवाईकांनी रात्री उशिरा कूपर हॉस्पिटलमधील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरसह इतर कर्मचार्‍यांना त्यांनी मारहाण केली नाही. मात्र सामानाचे नुकसान केल्याने तेथील वातावरण प्रचंड तंग झाले होते. ही माहिती प्राप्त होताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी हनीफसह इतर नातेवाईकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणयात आणण्यात आले होते.

याप्रकरणी हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरुन या सर्वांविरुद्ध पोलिसांनी विविध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नोटीस देऊन त्यांना नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान साबियाला कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला जवळच्या एका आयुवैदिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेही तिला डॉक्टांनी मृत घोषित केले होते. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही. या अहवालानंतर साबियाचा मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page