मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मोबाईलचा पासवर्ड चोरी करुन स्वतसह इतर बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करुन एका २५ वर्षांच्या नोकराने मालकीणीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मोहन गोपाल भागोरा या नोकराला जुहू पोलिसांनी अटक केली. गेल्या दिड वर्षांत त्याने सुमारे आठ लाखांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मालकीणीला संशय येऊ नये म्हणून तो सर्व मॅसेज डिलीट करत होता. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून लवकरच अपहार केलेली रक्कम हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावना गौतम जसरा ही महिला जुहू येथील जेव्हीपीडी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचा कलाकृतीचा तर तिच्या पतीचा प्रिटींगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी तीन नोकर असून तत मोहन भागोरा या २५ वर्षांच्या तरुणाचा समावेश होता. दिवसभर काम केल्यानंतर त्याच्यासह अन्य एक नोकर तिथेच राहत होते. तिचे दोन बँकेत खाते असून अनेकदा त्या ऑनलाईन व्यवहार करतात. सोमवारी ३ फेब्रुवारीला तिने ऑनलाईन पोर्टलवरुन कॉफी मागितली होती. डिलीव्हरी बॉय आल्यानंतर तिने कॉफीचे ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे पेमेंट फेल गेले. तिने पुन्हा दोन ते तीन वेळा पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पेमेंट झाले नाही. यावेळी तिला दिवसभरात एक लाख रुपयांचे लिमिट संपल्याचा मॅसेज आला होता. तिने दिवसभरात कोणालाही पैसे ट्रान्स्फर केले नव्हते. तरीही तिला हा मॅसेज आला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या मोबाईल ऑनलाईन व्यवहाराची माहिती बघितली. त्यात तिला तिच्या बँक खात्यातून मोहन भागोरा याला एक लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. तिने त्याला पैसे पाठविले नव्हते, तरीही तिच्या बँक खात्यातून हा व्यवहार झाला होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी मोहनकडे विचारणा केली होती. सुरुवातीला तो प्रचंड घाबरला. उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. मात्र नंतर त्याने त्यानेच तिच्या मोबाईलवरुन स्वतच्या बँक खात्यात एक लाख रुपये ट्रान्स्फर केल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान त्याने तिच्या मोबाईल फोनचा पासवर्ड पाहिला होता. हा पासवर्ड समजल्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवरुन सात ते आठ वेळा त्याच्यासह इतर बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर तो मॅसेज डिलीट करत होता. जेणेकरुन तिला संशय येणार नाही. सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्याने मोबाईलचा पासवर्ड चोरी करुन तिच्या बँक खात्यातून त्याच्यासह इतर बँक खात्यात सुमारे आठ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देताच तो पळू लागला. यावेळी तो दुसर्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याच्याविरुद्ध भावना जसरा हिने मोहनविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन मोहनला बुधवारी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.