मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 नोव्हेंबर 2025
मुंबई, – विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिकणार्या आठ ते नऊ वर्षांच्या तीन शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 48 वर्षांच्या आरोपी व्हॅनचालकास जुहू पोलिसांनी अटक केली असून त्याच्यविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने शिक्षकांसह पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
32 वर्षांची तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. बळीत तिची मुलगी असून ती विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिकते. याच शाळेतील मुलीना ने-आण करण्यासाठी आरोपी व्हॅनचालक म्हणून काम करतो. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जुहू येथील शाळेजवळ आरोपी त्याच्या व्हॅनसोबत उभा होता. काही वेळानंतर बळीत मुलीला व्हॅनमध्ये बसविताना त्याने तिच्या छातीवरुन नकोसा स्पर्श, तिच्याशी गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला होता.
इतकेच नव्हे तर तिच्या आठ आणि नऊ वर्षांच्या अन्य दोन मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर या तिन्ही मुलींकडून त्यांच्या पालकांना समजला होता. ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तक्रारदार महिलेने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तसेच आरोपी व्हॅनचालकाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 48 वर्षांच्या आरोपी व्हॅनचालकास पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या तिन्ही मुलींना नंतर वैद्यकीय तपासणीसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.
आरोपी सांताक्रुज येथे राहत असून त्याच्यावर लहान मुलांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी होती, मात्र त्यानेच तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.