मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून गौस इखलाक पटेल या 25 वर्षांच्या तरुणाच नऊजणांच्या टोळीने लाथ्याबुक्यांनी, बांबू तसेच तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सहाजणांना अटक केली आहे. पीरमोहम्मद सय्यद हुसैन, उस्मान इब्राहिम कुरेशी, ताबिश उस्मान कुरेशी, अमन उस्मान कुरेशी, इम्रान इमामसाहेब शेख आणि सिराज हुसैन सय्यद अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून पळून गेलेल्या या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता विलेपार्ले येथील प्रेमनगर, शिफ्टींग इमारतीसमोर घडली. मुस्तफा इखलाक पटेल हा तरुण अंधेर येथे राहतो असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. त्याचे वडिल इखलाक हे रिक्षाचालक तर भाऊ गौस आणि मखदुम हे खाजगी काम करतात. नौशाद कादिर अहमद शेख आणि असिल अन्सार शेख हे दोघेही त्याचे लहानपणापासून मित्र आहेत. अटक व पाहिजे आरोपी याच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. 11 मार्चला रात्री एक वाजता त्याचा भाऊ गौस हा प्रेमनगर, शिफ्टींग इमारतीसमोरुन जात होता. यावेळी पीरमोहम्मद, त्याचा भाऊ हसन, तबिश कुरेशी, रिझवान सय्यद यांचे गौससोबत क्षुल्लक कारणावरुन वाद होता. त्यानंतर चार दिवसांनी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने गौसकडे पाहून यापुढे एकटा दिसला तर तुला तिथे मारुन टाकू अशी धमकी दिली होती.
याच दरम्यान मुस्तफाला त्याच्या भावाला संबंधित आरोपी मारण्याचा कट रचत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तो त्यांना समजविण्यासाठी तिथ गेला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी या आरोपींनी मुस्तफा, नौशाद, त्याचा भाऊ नूरमोहम्मद शेख, मित्र असिल शेख आणि गौसला बेदम लाथ्याबुक्यांनी तसेच बांबूने मारहाण केली होती. काही वेळानंतर त्यांनी त्याचा भाऊ गौस याच्यवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यात गौस हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात अले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुस्तफा पटेल याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी नऊजणांविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अजहर कुरेशी, रिझवान सय्यद आणि हसन सय्यद या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.