जुन्या वादातून तरुणाची हत्या करणार्या दुकलीस अटक
मृत तरुणासह दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – जुन्या वादातून एका 27 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. कृष्णा मडास्वामी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी परमेश देवेंद्र ऊर्फ परमेश्वर आणि किसन देवेंद्र या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली. मृत कृष्णा, अटक आरोपी परमेश आणि किसन हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
ही घटना विलेपार्ले येथील व्ही. एम. रोड, नेहरुनगरजवळील नाल्याजवळील बसस्टॉपसमोर घडली. कृष्णा आणि दोन्ही आरोपी विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरातील रहिवाशी आहेत. ते स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मारामारीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णाचे परमेशसोबत वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्यात अनेकदा हाणामारी झाली होती. रविवारी पहाटे चार वाजता कृष्णा नाल्याजवळील बसस्टॉपजवळ होता. यावेळी तिथे परमेश आणि किसन आले. त्यांनी जुना वाद काढून त्याला शिवीगाळ केली होती. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
रागाच्या भरात परमेशने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात कृष्णा हा गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती प्राप्त होताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या कृष्णाला पोलिसांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात या हत्येमागे परमेश आणि किसन यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या परमेश आणि किसन या दोघांनाही पोलिसांनी विलेपार्ले येथून अटक केली. चौकशीत त्यांनी पूर्ववैमस्नातून कृष्णाची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पहाटे झालेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.