एक कोटीच्या सोन्याचा विटा घेऊन नोकराचे पलायन

जुहू येथील घटना; नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – सुमारे एक कोटीच्या सोन्याच्या दोन विटा घेऊन कर्मचार्‍यानेच पलायन केल्याची घटना जुहू परिसरात घडली. याप्रकरणी प्रभूनारायण मिश्रा या २८ वर्षांच्या नोकराविरुद्ध जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरु केला आहे.

प्रविण रामकृष्णा घाग हे मालाड येथील न्यू दिडोंशी ओमसाई गणेश सोसायटीमध्ये राहतात. ते जगदीशकुमार मदनलाल गुप्ता (७६) यांच्याकडे कामाला आहेत. जगदीशकुमार हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथील जेव्हीपीडी स्किम, अग्रवाल हाऊसच्या रुम क्रमांक १००१ मध्ये राहतात. त्यांच्याकडेच गेल्या अठरा महिन्यांपासून प्रभूनारायण मिश्रा हा घरगडी म्हणून काम करत होता. त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात सुमारे एक कोटी रुपयांचे दोन सोन्याच्या विटा ठेवल्या होत्या. १० मे ते २० जून २०२४ या कालावधीत प्रभूनारायणने कपाटातून या दोन्ही विटा काढून घरातून पलायन केले होते. दोन दिवसांपूर्वी जगदीशकुमार गुप्ता यांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. या दोन्ही विटा प्रभूनारायणने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी प्रविण घाग याला जुहू पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने प्रविण वाघ याने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रभूनारायण मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या प्रभूनारायणचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page