मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सलाम केला नाही म्हणून एका रिक्षाचालकावर तिघांनी बिअरच्या बाटलीने भोसकल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात राजेश कमल शेख हा जखमी झाला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मनी सेल्वम देवेंद्र ऊर्फ टटुमणी याला जुहू पोलिसांनी अटक केली तर परमेश कप्पा देवेंद्र आणि मनी परमेश देवेंद्र हे दोघेही अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहे. या दोघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. मनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी रात्री अडीच वाजता विलेपार्ले येथील एन. एस रोड, जैनविहार इमारतीजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राजेश हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून गोरेगाव येथील शहिद भगतसिंग क्रमांक एकमध्ये राहतो. तो रिक्षाचालक म्हणून काम करत असून त्याची बहिण राबिया खातून ही विलेपार्ले येथील नेहरुनगर, अण्णा चाळीत राहते. मंगळवारी राजेश हा त्याच्या पत्नी अस्लिमासोबत त्याच्या बहिणीकडे गेला होता. रात्री उशिरा अडीच वाजता ते घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी राबिया ही त्यांना सोडण्यासाठी आली होती. रस्त्यार गप्पा मारताना तिथे मनीसह त्याचे दोन सहकारी आले. या तिघांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. त्यांनी त्याला त्यांच्या परिसरात का आलास, तुला माहीत नाही का आम्ही या परिसरातील दादा आहेत, त्यामुळे आम्हाला सलाम कर असे सांगितले. यावेळी राजेशने राबियाला ते तिघे कोण आहेत याबाबत विचारणा केली असता तिने ते तिघेही गुंड प्रवृत्तीचे लोक असून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगितले. तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका असे सांगून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे राजेश हा पत्नीसोबत त्याच्या रिक्षातून जात असताना या तिघांनी त्याला पुन्हा आम्हाला सलाम करणार नाही का अशी विचारणा केली. त्यानंतर मनीने त्याच्याकडील बिअरच्या बाटलीने त्याच्या डोक्यात वार केला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. यावेळी इतर दोघांनी त्याला पकडून त्याला आता जिवंत सोडायचे नाही अशी धमकी देत त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी फुटलेल्या बाटलीने एकाने त्याच्या पोटात वार केला.
या हल्ल्यात राजेश हा गंभीररीत्या जखमी झाला. यावेळी त्याच्या पत्नीसह बहिणीने आरडाओरड सुरु केल्याने तिथे लोक जमा झाले. मात्र या तिघांनी या लोकांना मरायचे असेल तर पुढे या अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर ते तिघेही तिथे पार्क केलेल्या काही वाहनांच्या काचा फोडून निघून गेले. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या राजेशला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मनीसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मनीला पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.