चौदा व सतरा वर्षांच्या मुलांना विवस्त्र करुन धिंड काढली
चोर समजून स्थानिक रहिवाशांकडून अमानुष अत्याचार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विलेपार्ले परिसरात चोरीच्या उद्देशाने आल्याचा समज करुन एका टोळीने चौदा आणि सतरा वयोटातील दोन अल्पवयीन मुलांचे हातपाय बांधून, त्यांचे केस कापून, विवस्त्र करुन धिंड काढल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे.
६० वर्षांची तक्रारदार महिला कचरा वेचण्याचे काम करत असून ती विलेपार्ले येथील नेहरुनगर, अंबेमाता चाळीत राहते. तिच्या विवाहीत मुलीचे निधन झाले असून तिला चौदा आणि सतरा वर्षांचे दोन मुले आहे. या मुलांचा त्यांचे वडिल पालनपोषण करत नसून तो वेगळा राहतो. त्यामुळे ती तिच्या दोन्ही नातूसोबत तिथे राहत होती. सोमवारी रात्री तीन वाजता तिचे दोन्ही नातू विलेपार्ले येथील नायडू चाळ, राहुल मेडीकलजवळून जात होते.ते दोघेही चोर असून चोरीच्या उद्देशाने परिसरात आल्याचा समज करुन या दोघांनाही एका टोळीने पकडले. या दोघांनाही त्यांनी शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. काही वेळानंतर त्यांचे हातपाय बांधून केस कापले. त्यांना विवस्त्र करुन त्यांची परिसरात धिंड काढली होती. त्याचे काही लोकांनी मोबाईलवरुन व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. या व्हिडीओमुळे या दोन्ही अल्पवयीन मुलांची प्रचंड बदनामी झाली होती. सकाळी हा प्रकार तक्रारदार महिलेला तिच्या पुतणीकडून समजला होता. तिने त्यांचा व्हायरल व्हिडीओ तिला दाखविला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने या दोघांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना ते दोघेही परिसरात दिसून आले. त्यांची चौकशी केल्यानंतर तिला घडलेला प्रकार समजला होता. या दोघांनी आपण चोरी केली नाही किंवा चोरीच्या उद्देशाने तिथे गेलो नव्हतो. तरीही सुनिल पटवासह इतर आरोपींनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, त्यांचे केस कापून त्यांना विवस्त्र करुन त्यांची परिसरात धिंड काढली. त्यांचे व्हिडीओ काढून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे सांगितले. या घटनेनंतर तिने दोन्ही मुलांसोबत जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने सुनिल पटवासह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध ११५ (२), १२७ (२), ३५१ (२), ३५२, ३५६ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ७५ मुंबई बाल अधिनियम सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच जुहू पोलिसांना देण्यात आले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.