मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – दोन मित्रांमध्ये सुरु असलेल्या भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका पोलीस शिपायासह दोघांना एका आरोपीने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात पोलीस शिपाई संदीप बाळकृष्ण साळुंखे यांच्यासह मसुबचे जवान सुलाने यांना किरकोळ दुखापत झाली होती. प्राथमिक औषधोपचारानंतर या दोघांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी जुहू पोलिसांनी कर्तव्य बजाविणार्या पोलीस शिपायासह दोघांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून गौस इकलाख या २५ वर्षांच्या तरुणाला अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदीप साळुंखे हे वरळीतील बीडीडी चाळीत राहत असून जुहू पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी राहुल इरा शर्मा आणि गौस इकलाख हे दोघेही हनुमाननगर परिसरात भांडण करत होते. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या जुहू पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलीस घटनास्थळी गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गौसने संदीप साळुंखे यांच्यासह मसुबचा जवान सुलाने यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांना वर्दी उतरविण्यासह जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकारामुळे तिथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांचे इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे दाखल झाले होते. या पोलीस पथकाने पोलिसांवर हल्ला करणार्या गौसला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी संदीप साळुंखे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गौसविरुद्ध पोलिसांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी मारहाण करणे, पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला सायंकाळी पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गौस हा अंधेरीतील एस. व्ही रोड, इर्ला ब्रिजजवळील छोटू हसन चाळीत राहत असून रिक्षाचालक म्हणून काम करतो. त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.