मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – दिल्लीहून मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या अर्जुन कैलास गिरी या २६ वर्षांच्या तरुणावर कुत्र्याला हाकलण्याच्या वादातून एका श्वानप्रेमीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विलेपार्ले येथील जुहू चौपाटीत घडली. या चाकू हल्ल्यात अर्जुनचा अंगठाच कापला गेला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्लेखोराला काही तासांत अटक केली. ओमकार मनोहर मुखिया ऊर्फ ओमकार ब्रिजवली शर्मा असे या २५ वर्षीय श्वानप्रेमीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अर्जुन हा मूळचा दिल्लीचा रहिवाशी असून सध्या तो पवई परिसरात राहतो. शेअर मार्केट ट्रेडिंगशी संबंधित असलेला अर्जुन हा दिल्लीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी सकाळी सहा वाजता तो विलेपार्ले येथील जुहू चौपाटी येथे आला होता. गेल्या आठवड्यात सुट्टी असल्याने तो त्याच्या काही मित्रांसोबत दिल्लीहून मुंबईत आला होता. रविवारी सकाळी सहा वाजता तो मित्रांसोबत विलेपार्ले येथील जुहू चौपाटी येथे फिरायला आला होता. तिथे काही वेळ फेरफटका मारल्यानंतर ते सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी तेथील एका स्टॉलजवळ एक कुत्रा बसला होता. तो कुत्र्याला घाबरत असल्याने त्याने कुत्र्याला हटकले. यावेळी कुत्रा त्याच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे त्याने कुत्र्याला हाकलण्यासाठी त्याच्याजवळील एक खुर्ची उचलली होती.
हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या ओमकारच्या लक्षात आला. त्याला अर्जुन हा कुत्र्याला मारहाण करत आहे असे वाटले. त्यामुळे त्याने त्याला जाब विचारला होता. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळानंतर ओमकार हा जवळच्या स्टॉलवर गेला आणि त्याने अर्जुनवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा डाव्या हाताचा अंगठा कापला गेला. रक्तबंबाळ झालेल्या अर्जुनलला त्याच्या मित्रांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याच दरम्यान ओमकार तेथून पळून गेला. मित्राकडून ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अर्जुनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ओमकारविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत ओमकारला पपोलिसांनी जुहू परिसरातून अटक केली. चौकशी त्याने कुत्र्यावरुन झालेल्या वादातून अर्जुनवर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.