स्त्री जातीचे एक दिवसांचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ
मृत अर्भकाला टाकून पळालेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जुलै २०२४
मुंबई, – स्त्री जातीचे एक दिवसांचे मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत सापडल्याने विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती. या अर्भकाला टाकून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नजमा शहाजहान मुल्ला ही महिला विलेपार्ले येथील नेहरुनगर, सिद्धीविनायक चाळीत राहत असून घरकाम करते. बुधवारी दुपारी बारा वाजता तिला सिद्धीविनायक चाळीजवळील एका प्लास्टिकच्या पिशवीत एक अर्भक पडल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने जुहू पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी अर्भकाला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी ते अर्भक मृत असल्याचे सांगितले. स्त्री जातीचे ते एक दिवसांचे अर्भक असून तिला मारण्याच्या तसेच तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने ते अर्भक एका प्लास्टिकच्या पिशवीत तिथे टाकून पलायन केले होते. याप्रकरणी नजमा मुल्ला हिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ९१, ९४ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता सूर्यवंशी या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.