मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – अश्लील व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटकेची धमकी देऊन एका तरुणाला ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्यांला गजाआड करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. आशिष स्वामी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सेक्सटॉर्शन करणारी एक सराईत टोळी असून या टोळीने मुंबईसह इतर शहरात अशाच प्रकारचे काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. या टोळीला फसवणुकीसाठी आशिषने बँकेत खाते उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३० वर्षांचा तक्रारदार तरुण हा विलेपार्ले येथे त्याच्या आई-वडिलांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो एका डेटिंग ऍपवर ऍक्टिव्ह होता. याच ऍपवरुन त्याची सोनी नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. याच दरम्यान तिने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्याला समोर एक तरुणी तिचे अंगावरील सर्व कपडे काढत असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने फोन बंद केला होता. काही वेळानंतर तिने त्याला पुन्हा व्हिडीओ कॉल केला, यावेळी ही तरुणी पुन्हा त्याच्यासोबत अश्लील हावभाव करताना दिसून आली. त्यामुळे त्याने तिचा मोबाईल क्रमांक डिलीट केला होता. या घटनेनंतर त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्याचे एका तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ युट्यूबवर अपलोड झाले आहे. या व्हिडीओबाबत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितले. युट्यूबवरुन ते व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तसेच अटकेची कारवाई होऊ नये असे वाटत असल्यास त्याने त्याला ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. बदनामीसह अटकेच्या भीतीने त्याने त्याला ५० हजार रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती त्याची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता.
या प्रकारानंतर त्याने घडलेला प्रकार जुहू पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान ही रक्कम आशिष स्वामी या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे या बँक खात्याची माहिती काढून जुहू पोलिसांचे एक विशेष पथक राजस्थानात गेले होते. स्थानिक पोलिसांच्या या मदतीने या पथकाने अलवर परिसरातून आशिष स्वामीला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच फसवणुकीसाठी आरोपींना बँक खाते वापरण्यासाठी दिल्याचे उघडकीस आले. ही रक्कम जमा होताच त्याने एटीएममधून पैसे काढून त्याच्या सहकार्यांना दिले होते. आशिष हा सध्या शिक्षण घेत असून एका महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्याच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.