दारुच्या पैशांवरुन होणार्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दारुच्या पैशांवरुन होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून खुशी मिथुनकुमार सिंग या २१ वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती मिथुनकुमार धर्मेंद्र सिंग (२५) याला जुहू पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिथुनकुमार आणि खुशी यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, लग्नानंतर दारुच्या पैशांवरुन त्याच्याकडून तिचा मानसिक शोषण सुरु होता, त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अर्चिता राजजियावन जैस्वाल ही तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरात राहत असून एका दाताच्या क्लिनिकमध्ये कामाला आहे. खुशी ही तिची मोठी बहिण असून तिची सोशल मिडीयावरुन त्याच परिसरात राहणार्या मिथुनकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २ सप्टेंबर २०२२ रोजी खुशी ही घरातून पळून गेली आणि तिने त्याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तिच्या पती आणि सासूसोबत नेहरुनगर परिसरात राहत होती. लग्नानंतर तिला मिथुनकुमारला दारु पिण्याचे व्यसन असल्याचे समजले होते. अनेकदा तो तिच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी करत होता. तिने पैसे दिले नाहीतर तो तिला बेदम मारहाण करत होता. तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. नेहमीच्या शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने अर्चिताला फोन करुन मंगळवारी २६ नोव्हेंबरला भेटायला बोलाविले होते.
दुपारी दिड वाजता ती तिला भेटण्यासाठी जात होती. यावेळी तिला मिथुनकुमार हा खुशीला बाईकवरुन घेऊन जाताना दिसला. खुशी ही बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे ती रिक्षाने त्यांच्या मागून गेली होती. काही वेळानंतर त्याने तिला कूपर हॉस्पिटलमध्ये आणले होते. तिथे खुशीला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तपासादरम्यान मंगळवारी खुशीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे तिने ही माहिती तिच्या आई-वडिलांनी सांगितली. मिथुनकुमार हा खुशीच्या दारुच्या पैशांवरुन मानसिक व शारीरिक शोषण करत होता. अनेकदा तो तिला बेदम मारहाण करत होता. या शोषणाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली होती. त्यामुळे अर्चिताने मिथुनकुमारविरुद्ध तिच्या बहिणीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मिथुनकुमारला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.